अनेक पदे रिक्त : गावांचा विकास कसा होणार?सुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यातील सुकडी/डाकराम जिल्हा परिषद क्षेत्रातील पंचायत समिती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे इंदोरा/खुर्द (निमगाव) हे गाव लोकसंख्येच्या आधारे सुमारे दोन ते अडीच लोकसंख्येचे आहे. मात्र या गावातील जनतेची कामे करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची विविध पदे रिक्त आहेत. त्यात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने गावचा विकास खोळंबला आहे. त्याचे असे की, इंदोरा/खुर्द ग्रामपंचायतमधील चपराशाचे पद रिक्त आहेत. श्रीकृष्ण सुरसाऊत हे मागील दोन वर्षापुर्वी सेवानिवृत्त झाले व तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत हे पद ग्रामपंचायतने भरले नाही. त्यामुळे ग्राम पंचायतची कामे व गावातील इतर कामे ही रामभरोश्यावर आहेत. दुसरे म्हणजे रोजगार सेवकाचेही पद रिक्त आहे. मागील १० ते ११ महिन्यापूर्वी रोजगार सेवक हेमंत पटले यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला व तेव्हापासून हे पद रिक्त आहे. याकडे ग्राम पंचायतने दुर्लक्ष करून आता निमगाव येथील रोजगार सेवकाला प्रभार दिला आहे. एकीकडे शासन १०० दिवस रोजगार हमीची कामे देण्याचे सांगत आहे. मात्र रोजगार सेवकच नसल्याने मजूरांना कामे देणार कोण असा प्रश्न येथे पडतो. विशेष म्हणजे यासह ग्रामसेवकाचे पदही रिक्त आहे. येथील ग्रामसेवक मेश्राम यांच्यावर २८ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने तेव्हापासून हे पद रिक्त पडून आहे. गावच्या विकासाचा कणा म्हणून संबोधले जाणारे ग्रामसेवक मात्र या गावाला लाभले नसल्याने गावचा विकास खोळंबला आहे. त्यातल्या त्यात तलाठ्यापासूनही हे गाव वंचीत आहे. इंदोरा, निमगाव, मंगेझरी, गोविंदपूर, घोटी, कोडेबर्रा व रूस्तमपूर हे आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जातात. येथील तत्कालीन तलाठी बंसोड या नागपूरवरून ये-जा करीत व कार्यालयात हजर राहत नसल्याने त्यांना पदावरुन कमी करण्यात आले. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. गावातील शेतकऱ्यांना ७/१२, ८-अ, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले व शासकीय योजनेचे अनुदान इत्यादी कामे अडकून पडली आहेत. यात तलाठ्यांना सहकार्य करणारे कोतवालही नाहीत. दोन महिन्यांपूर्वी दवराम सोनेवाने यांचे निधन झाल्यामुळे हे पद रिक्त पडून आहे. एवढ्यावरच समस्या सुटत नसून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधिकाऱ्यांचे पद ही रिक्त आहे. येथील शाळेचा कारभार प्रभाऱ्यांच्या भवरशावर चालत आहे. एकीकडे शासन अनेक योजनांचा उदोउदो करते. तर दुसरीकडे मात्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणारे कर्मचारी नसल्याने त्या योजना सर्व समान्य जनतेपर्यंत कसा पोहचणार हे येथे कळेनासे झाले आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या गावचे काय होणार असा सवाल येथील गावकऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)
इंदोरा-निमगावला रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Updated: March 6, 2016 01:41 IST