अवैध अवजड वाहतूक : चांदीटोला-मकरधोकडा-पदमपूर-बुधरीटोला मार्गाचा उपयोगसिरपूरबांध : सध्या सुरू असलेल्या आरटीओ चेक पोस्ट सिरपूरबांध चेक पोस्टवर क्षमतेपेक्षा अधिक मालवाहक गाड्यांवर दंड वसूल करण्यात येते. परंतु काही वाहन मालक क्षमतेपेक्षा अधिक माल भरून ग्रा.पं. सिरपूरबांध अंतर्गत येत असलेल्या चांदीटोला-मकरधोकडा-पदमपूर-बुधरीटोला या गावांतर्गत येणाऱ्या रस्त्याचा अवैध वाहतुकीकरिता वापर करतात. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे.सदर मार्गावरून दररोज शंभर ते दीडशे ट्रक निघतात. सदर रस्ता चेकपोस्टपासून फक्त ८० ते ९० मीटरवरून ट्रक हायवेवर निघतात. हा प्रकार आरटीओ यांना माहीत असूनही ते डोळे बंद करून राहतात. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. या अवैध जडवाहतुकीमुळे सदर रस्ता पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. या रस्त्यावरून लोकांना प्रवास करणे करताना मोठीच कसरत करावी लागते. तसेच अवैध वाहतुकीमुळे कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत सिरपूरबांधतर्फे संबंधि विभागांना पत्र व्यवहार करून होत असलेली अवैध जडवाहतूक बंद करून हाईट बेरिकेट लावण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सरपंच नहरसिंग फंडकी यांनी दिली. परंतु आजपर्यंत प्रशासनाकडून काहीही करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. याच मार्गावरून चांदीटोला, मकरधोकडा, पदमपूर, बुधरीटोला या गावांतील विद्यार्थी शिक्षणाकरिता देवरी व सिरपूरबांध येथे दररोज ये-जा करतात. परंतु सदर रस्ता अवैध जडवाहतुकीमुळे पूर्णत: खराब झाल्याने विद्यार्थ्यांना मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागतो. या वाहतुकीत काही दलालांचासुध्दा हातभार असल्याचे समजते. याकडे प्रशासनाने लक्ष घालून ही वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे. अधिकाऱ्यांची उदासिनता आणि निष्काळजीपणाचा फायदा घेत शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडविला जात आहे. ज्या गावातून ही अवैध जडवाहतूक होत आहे, त्या पदमपूर गावातील महिलासुध्दा गाड्यांकडून पैसे घेण्याकरिता रस्त्यावर उभ्या होत असताना दिसतात. महिला रस्त्यावर येत असल्यामुळे कधीही अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने लक्ष घालून सदर प्रकाराकडे लक्ष द्यावे व दोषींवर कारवाई करावी, असे पोलीस पाटील प्रमोद ब्राह्मणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बुडतोय शासनाचा महसूल
By admin | Updated: March 5, 2016 02:06 IST