अर्जुनी-मोरगाव : मानवी जीवनात एकदा राष्ट्रध्वज फडकाविण्याचा मान आपल्याला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असली तरी हा मान सहजासहजी कुणाला मिळत नाही. मात्र तालुक्यातील ग्राम खांबी येथील ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांला देऊन एक नवा पायंडा रचला. सरपंच प्रकाश शिवणकर यांनी पुढाकार घेत आपल्या अधिकाराचा त्याग करीत गावातील इतर विद्यार्थ्यांना व युवा वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून ही एक नवी सुरुवात केली आहे.
प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर, शैक्षणिक संस्थांचे वरिष्ठ किंवा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशिष्ट पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना ध्वजारोहण करण्याचा मान मिळतो. यामुळे प्रत्येकाला राष्ट्रध्वज फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. एकीकडे छोट्या-मोठ्या अधिकारासाठी भांडणे होतात. राजकीय कुरघोड्या व गटातटाचे राजकारण करून पाय खेचण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र हे सर्व बाजूला सारून सरपंच शिवणकर यांनी पुढाकार घेत गावातील वर्ग दहावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेला विद्यार्थी धनंजय हेमंत खोटेले याला पारितोषिक देऊन प्रथम त्याचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर त्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान त्याला देण्यात आला. जीवनात यश संपादन करावे या उदात्त हेतूने धनंजयच्या हातून ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच, माजी सरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, मदन रामटेके, तंटामुक्त समिती अध्यक्ष मेंढे, पोलीस पाटील मेश्राम, शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच शिवणकर यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.