सडक-अर्जुनी : तालुक्यातील कनेरी गावात दोन वर्षापासून दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच पाणीटंचाईने डोके वर काढले असल्याची माहिती उपसरपंच प्रेमलाल मेंढे यांनी दिली. कनेरी-राम गावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी ३० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या मिनी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावकऱ्यांची तहान भागविली जाते. गाव परिसरात पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे ती ३० हजार लिटर पाण्याची टाकी भरण्यासाठी तीन दिवस लागतात. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. कनेरी-राम गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर शासनाचे पाच बंधारे बांधून सुध्दा एकाही बंधाऱ्याजवळ थेंबभर पाणी साठवण न केल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. लाखो रुपये खर्चून हे बंधारे बांधले, पण आता ते शोभेच्या वास्तु ठरले आहेत. सार्वजनिक पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांची डागडुजी कडून पाणी कसे साठविता येईल याचा नियोजनबध्द आराखडा तयार करून पाणी अडविण्याची सुविधा केली पाहिजे. पाणी अडविल्याने पाण्याची पातळी उंचावेल व पाण्याची समस्या दूर होईल. सध्या तात्पुरती पिण्याच्या पाण्याची निवारणासाठी इंदू मेंढे, वासराम मेंढे यांच्या घराजवळ बोरवेल देण्यात यावे. या बोरवेलच्या माध्यमातून ते पाणी मिनी पाणी पुरवठ्याच्या टाकीत देवून संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करता येईल. पंचायत समितीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देवून पाणी समस्या दूर करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
कनेरी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या
By admin | Updated: February 18, 2015 01:33 IST