रावणवाडी : कमी खर्चात, कमी वेळात व कमी जागेत तयार होणाऱ्या विंधन विहिरीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याची बाब पुढे येत आहे.पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहिरी खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. त्यासाठी लागणारी भरपूर जागा, खोदकामास लागणारा भरपूर वेळ, त्यातून निघणारी माती व मलब्याची विल्हेवाट लाण्याची समस्या यामुळे बोअरवेल खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. बोअरवेलमधून भरपूर शुद्ध पाणी उपलब्ध होतो, त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी बोअरवेल्स उभारण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे.बोअरवेल्स उभारण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागात जवळपास २०० ते २५० फुटांपर्यंत यंत्राद्वारे खोदकाम करावे लागते. यावर स्वयंचलित विद्युत यंत्र बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा दैनंदिन वापरात मुबलक सिंचनासाठी केला जातो. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.पूर्वी पावसाचे पाणी थेट विहिरीत जायचे. मात्र बोअरवेल्सचे तसे नाही. पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी बोअरवेल्समध्ये मुरत नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फुटांपर्यंत झिरपण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. तत्पूर्वी जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे. बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे सध्या बोअरवेल खोदण्यासाठी अधिकचे २०० ते ३०० फुटापर्यंत खोदकाम करावे लागत आहे.
पाण्याच्या पातळीत घट
By admin | Updated: December 17, 2015 01:53 IST