देवरी : पावसाअभावी या क्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी चिचगड-ककोडी क्षेत्रातील जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी ऐतिहासिक पदयात्रा काढून देवरी गाठले. ककोडी ते देवरी असे ४० कि.मी.चे अंतर पार करीत तहसील कार्यालयावर विशाल मोर्चाच्या स्वरूपात धडक देणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांना पाहून प्रशासन हादरून गेले. मात्र उपविभागीय अधिकारी सूनील सूर्यवंशी यांनी संयमाने परिस्थिती हाताळत मोर्चेकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली.सकाळी ८ वाजताच्या सुमारास छत्तीसगड सीमेकडील ककोडी येथून या पदयात्रेला सुरूवात झाली. मार्गात मिळेल त्या गावातूनही महिला-पुरूष या पदयात्रेत सहभागी होत होते. दुपारी हा मोर्चा चिचगड मार्गे देवरीत पोहोचला. तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजुने जड वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. या क्षेत्राला त्वरित दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना विविध सवलती देण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.देवरीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही राजकीय नेत्याच्या नेतृत्वाशिवाय एवढा विशाल मोर्चा काढण्यात आल्याने हा चर्चेचा विषय झाला होता. शेतकरी-मजूर संघटनेच्या बॅनरखाली एकत्रित झालेल्या या नागरिकांमध्ये ककोडी, चिचगड परिसरातील अनेक गावांमधून नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर सर्वांनी आपल्या शिदोऱ्या काढून मिळेल तिथे बसून जेवण केले. (प्रतिनिधी)अन् वरुणराजाने हजेरी लावली४मोचेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर पोहोचून घोषणाबाजी करीत महामार्गावर ठाण मांडल्याने प्रशासकीय यंत्रणेची काही वेळासाठी तारांबळ उडाली. एक तास रास्ता रोको केल्यानंतर उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी मोर्चेकऱ्यांच्या समोर जाऊन निवेदन स्वीकारले. याचवेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. ज्या पावसाच्या अवकृपेने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली त्या पावसाच्या आगमनामुळे मोर्चेकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. पावसात भिजतच उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले व शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. दोन दिवसात मागण्यांवर निर्णय होणार?४मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात चिचगड-ककोडी क्षेत्र त्वरित दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा, शेतकऱ्यांना जॉबकार्डमध्ये २०० मानक दिवसाचा रोजगार देण्यात यावा, वीज नुकसानीची भरपाई देण्यात यावी, गुरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी, आदी मागण्या प्रामुख्याने केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यासंबंधीची ग्वाही दिली. नंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. लवकरात लवकर मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुष्काळ घोषित करा
By admin | Updated: September 8, 2015 03:53 IST