सर्वत्र पाणीच पाणी : शेतीच्या कामांना आला वेग गोंदिया : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार रविवारी (दि.१९) सुरूच होती. या संततधार पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला असून शेतकरी वर्ग या पावसाचे चांगलाच सुखावला आहे. जिल्ह्यात सर्वत्र या पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे शेतीच्या कामांनी वेग धरला आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात २१५.९ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून याची सरासरी २६.९८ एवढी आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. जुलै महिना अर्धा लोटून गेला तरिही पावसाने पाहिजे तशी हजेरी लावली नसल्याने दुष्काळाचे सावट दिसून येत होते. पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली होती व शेततऱ्यांच्या माथ्यावर चिंतेच्या रेघोट्या दिसून येत होत्या. आतापर्यंत फक्त पाण्याची सोय असलेल्या शेतक ऱ्यांचीच कामे सुरू होती. तर वरथेंबी पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मात्र आकाशाकडे नजरा लावून पाऊस बरसावा यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होते. मात्र शुक्रवारपासून (दि.१७) पाऊस जिल्ह्यात परतून आला असून रविवारपर्यंत (दि.१९) पावसाची रिपरिप सुरूच होती. मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे सध्या बघावे तेथे शेतांत गर्दी दिसून येत असून सर्वच आपल्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तर मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी पाऊस दडी मारून बसल्याने असहनीय उकाड्याचा सामना करावा लागत होता. उकाड्यापासून सुटका मिळावी यासाठी बंद झालेले कुलर पुन्हा सुरू करण्याची पाळी लोकांवर आली होती. मात्र या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. तर मागील चोवीस तासांत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक ६४.४ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून आमगाव तालुक्यात सर्वात कमी ८ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)२४ तासांत २१५.९ मिमी पाऊसशनिवारपासून आतापर्यंत बरसत असलेल्या पावसाची रविवारी सकाळ पर्यंत २१५.९ मीमी एवढी नोंद घेण्यात आली आहे. याची २६.९८ एवढी सरासरी आहे. तर जिल्ह्यात १ जूननपासून आतापर्यंत ३२२३.६ मीमी पाऊस बरसला असून त्याची ४०२.९४ एवढी सरासरी आहे. यात आतापर्यंत सालेकसा तालुक्यात सर्वाधिक ५००.६ मीमी पाऊस बरसला असून सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वात कमी ३३२.४ मीमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. रोवणीच्या कामांना आला वेग पाऊस नसल्यामुळे अडून असलेली रोवणीची कामे आता वेगात आली आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतकरी रोवणीसाठी पावसाची वाट बघत होता. त्यात आता मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप शेतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी कंबरकसून शेतात उतरला आहे. आपल्या परिवारासह शेतकरी रोवणी आटोपण्यात व्यस्त असून जिल्ह्यात बघावे तेथे रोवणीची कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात संततधार सुरूच
By admin | Updated: July 20, 2015 01:18 IST