पाच मातांचाही मृत्यू : बालमृत्यूचे प्रमाण वाढले, हजारामागे ३०.६५नरेश रहिले - गोंदियागोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष आहे असे सांगितले जाते. असे असताना एकीकडे राज्यात बालमृत्युचे प्रमाण १००० मागे २७ असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र हे प्रमाण १००० मागे ३०.६५ एवढे आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २८४ बालके दगावली आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २३९ उपकेंद्र, ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, ११ ग्रामीण रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, एक जिल्हा सामान्य रुग्णालय व एक महिला जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. दरवर्षी २० हजाराच्या जवळपास महिलांची प्रसूती जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये होत असते. यातील सर्वाधिक प्रसूती बाई गंगाबाई जिल्हा सामान्य रुग्णालयात होते. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या काळात ९ हजार ३५६ महिलांच्या प्रसूती करण्यात आल्या. त्यापैकी ९ हजार २६६ बालके जिवंत आहेत. १६३ महिलांच्या पोटातच बाळ मृत झाले होते. या सहा महिन्याच्या काळात जन्मलेल्या ८३ बालकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत बालकांपैकी ० ते १ वर्षे वयोगटात २४६ तर १ ते ६ वर्ष वयोगटातील ३८ बालकांचा समावेश आहे. जन्मल्यानंतर २४ तासात ८० बालके दगावली, १ ते ७ दिवसात १०१ बालके दगावली, ७ ते २८ दिवसात ३३ बालके, १ महिना ते १ वर्ष या वयातील ३२ बालके दगावली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या उपजत मृत्युदर २६.५५ टक्के आहे. तर माता मृत्यु दर ०.५४ टक्के आहे. जिल्ह्यातील २३९ उपकेंद्रांमध्ये २ हजार ८२४ प्रसूती, तर ४० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १ हजार ३६९ प्रसुती झाल्या आहेत. गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ४ हजार १०९, खाजगी रुग्णालयात १ हजार ७, घरगुती बाळंतपण ४७ करण्यात आले. यात ६८ बालके जुळे जन्माला आली आहेत. शासनाने माता मृत्युदराला शून्यावर आणण्याचे आवाहन केले असले तरी जिल्ह्यात ६ महिन्यात पाच मातांचा मृत्यू झालेला आहे. राज्य शासन बालमृत्यु दर कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र बालमृत्युची आकडेवारी कमी होण्यापेक्षा सतत वाढत आहे.
सहा महिन्यांत दगावले २८४ बालक
By admin | Updated: October 29, 2014 22:51 IST