कृषी विभागाचे नियोजन: नवीन हंगामात उत्पादन वाढीची अपेक्षागोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसाचा फटका सहन करीत असलेल्या गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या नवीन खरीप हंगामात चांगला पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्या आशेने शेतकरी वर्गाला खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. त्यासाठी कृषी विभागाकडूनही जोरात तयारी सुरू आहे.जिल्ह्यात मुख्य पिक असणाऱ्या भातपिकाचे खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर आहे. यावर्षी हे क्षेत्र १ लाख ९० हजार राहील असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यातून सरासरी २२०० किलो प्रतिहेक्टर एवढे उत्पन्न अपेक्षित असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.२०१४-१५ आणि २०१५-१६ या हंगामातील खरीप हंगामावर एक नजर टाकल्यास २०१५-१६ मध्ये उत्पन्नात बरीच घट आल्याचे दिसून येते. सरासरी हेक्टरी १५८२ किलो प्रतिहेक्टर एवढा उतारा यावर्षी आला. गेल्यावर्षी २०१४-१५ मध्ये हा उतारा २००२ किलो प्रतिहेक्टर एवढा होता. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे उत्पन्नात घट झाली. मात्र नवीन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे गणित योग्यरित्या साधले आणि पावसाचे प्रमाण योग्य प्रकारे झाले तर पुढील वर्षी चांगले उत्पन्न होऊन गेल्यावर्षीच्या उत्पन्नातील घट भरून निघू शकते, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन खरीप हंगामात ४ लाख १८ हजार मे.टन एवढे धानाचे उत्पन्न होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.भातपिकासोबत २०१६-१७ च्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र ७४०० हेक्टर, तीळ १२०० हेक्टर, मका १०० हेक्टर, मूग १०० हेक्टर, उडीद १०० हेक्टर आणि इतर कडधान्य १०० हेक्टरवर राहणार आहे. याशिवाय काही क्षेत्रात ऊस आणि भाजीपाल्याचे नियोजन करण्यात आले आहे. जमिनीचा पोत, बियाणे, फवारणी यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, असे उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)- तर गेल्यावर्षी भरपूर उत्पन्न झाले असते२०१५-१६ च्या खरीप हंगामात पिकांची स्थिती चांगली होती. सर्वसाधारण पर्जन्यमानानुसार जूनमध्ये २००.५ मिमी पाऊस पडतो तो गेल्यावर्षी २२१.५ मिमी पडला. जुलैमध्ये ४८८.३ मिमी ऐवजी २७५.५ मिमी पडला, आॅगस्टमध्ये ४३६.०२ मिमीऐवजी ३४६.८ मिमी पडला. सप्टेंबरमध्ये २२४.५ मिमीऐवजी २२४.९ मिमी पडला. मात्र आॅक्टोबरमध्ये धानपिकात दाणे भरण्याचा काळ असताना त्यावेळी ६२.९६ मिमी पाऊस पडण्याऐवजी अवघा २.२ मिमी पाऊस पडला. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आणि अपेक्षित उत्पन्न एकदम घटले. केवळ आॅक्टोबर महिन्यात पावसाची मात्र योग्य प्रमाणात झाली असती तर गेल्यावर्षी भरपूर उत्पन्न झाले असते, असे कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
१.९० लाख हेक्टरवर भातपीक
By admin | Updated: April 28, 2016 01:29 IST