लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे असावे, हे अजून ठरलेले नाही, असे स्पष्टीकरण नियोजन व सांख्यिकी खात्याने काल, रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. आजी-माजी आमदारांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणाबाबत मतभिन्नता असल्याने या प्रश्नावर आता काय तोडगा येतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
केपेचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी नगरसेवक, सरपंच, पंच यांच्या शिष्टमंडळासह शनिवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपेंत स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही तासांतच खात्याकडून हे स्पष्टीकरण आले आहे.
धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यांचा समावेश असलेला तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. मुख्यालय कुडचडेत असेल, असेही मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला देऊन प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. परंतु आता नगरनियोजन खात्याने मुख्यालयाची जागा अजून ठरलेली नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
दरम्यान, नव्याने निर्माण होणार असलेल्या तिसऱ्या जिल्ह्यातील चारही तालुके दुर्गम आहेत. या भागातील लोकांना सरकारी कामांसाठी मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावे लागत असे. प्रशासकीय सोयीसाठी तसेच लोकांना जलद सेवा मिळावी, यासाठी तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे.
कुडचडेच योग्य ठरेल, कारण कनेक्टिव्हिटी आहे : काब्राल
या विषयावर कुडचडेंचे आमदार नीलेश काब्राल म्हणाले की,' मुख्यालयासाठी कुडचडें हीच जागा योग्य आहे. कारण येथे कनेक्टिव्हिटी आहे. मोठे बसस्थानक, रेल्वे स्थानक आहे. बंदराचीही सोय आहे. केपेत उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे ते असू द्या. कुडचडेत जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुडचडे हीच जागा जिल्हा मुख्यालयासाठी असावी, अशी आमची मागणी आहे.
केपेबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक, ती जागाच योग्य : कवळेकर
माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले ऐकून घे असून केपेत तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय करण्याबाबत ते सकारात्मक आहेत. आम्ही निदर्शनास आणलेल्या प्रत्येक गोष्टींची नोंद त्यांनी करून घेतली आहे. केपे तालुक्याला याआधीच उपजिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. तेथे उपजिल्हाधिकारी कार्यालयही अस्तित्वात आहे. तसेच प्रथम श्रेणी न्यायालय आणि महत्त्वाची प्रशासकीय कार्यालयेही आहेत. मुख्यालय केपेतच होणे योग्य ठरेल. आम्ही मुख्यमंत्र्यांना याविषयी सर्व माहिती दिली आहे. सर्व सुविधा असल्याने येथेच जिल्हा मुख्यालय योग्य ठरेल.'
मुख्यालय केपेंतच हवे : एल्टन डिकॉस्ता
काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनीही मुख्यालय केपेतच हवे यावर जोर दिला. ते म्हणाले की, 'बस कनेक्टिव्हिटी व इतर गोष्टी पाहता मुख्यालय केपेतच हवे. येथे बहुतांश लोक अनुसूचित जमातींचे आहेत. त्यांच्याकडे चारचाकी वगैरे नाहीत. काहीजणांकडे दुचाकीही नाहीत. तिसऱ्या जिल्ह्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु मुख्यालय कुडचडेत केल्यास केपेवासीयांना त्याचा त्रास होईल. कुडचडेंत रस्ते वगैरे खराब आहेत.'असलेल्या तिसऱ्या जिल्ह्यातील चारही तालुके दुर्गम आहेत. या भागातील लोकांना सरकारी कामांसाठी मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावे लागत असे. प्रशासकीय सोयीसाठी तसेच लोकांना जलद सेवा मिळावी, यासाठी तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे.