पणजी : सनबर्न आणि सुपरसोनिक पार्ट्यांची धूम, तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या संख्येने आलेले देशी पर्यटक यामुळे तिसऱ्या दिवशी रविवारीही ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार घडले. रविवार सुट्टीचा दिवस असूनही राजधानी पणजी शहरात दिवसभर वाहतूक कोंडीचे प्रकार घडले. मांडवी पुलावर, तसेच पर्वरीच्या दिशेने मालिम भागात, साई सर्व्हिसजवळ उतरणीवर वाहतूक ठप्प झाली. मांडवी पुलाच्या अलीकडे म्हणजे पणजी बस स्टॅण्डजवळ लागलेल्या वाहनांच्या रांगा या पर्वरी ओ कोकेरो हॉटेलपर्यंत लांबल्या होत्या. अचानक वाढलेली वाहनांची वर्दळ हे कोंडीचे कारण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कोंडीत एक अॅम्बुलन्सही अडकून पडली होती. वाहतूक पोलीस विभागाने वाहतूक नियंत्रणासाठी खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत घेतली; परंतु वाहतूक नियमनात ते कमी पडल्याचे दिसून आले. शनिवारपासून कांदोळी, तसेच वागातोर येथे दोन पार्ट्या सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी शेजारी राज्यांमधून, तसेच विदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक आलेले आहेत. पर्वरी येथे पणजी-म्हापसा महामार्गावर दुपारनंतर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. वाहतूक पोलीस वाहतुकीच्या नियंत्रणात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे, बंगळुरूहून स्वत:ची वाहने घेऊन मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत. यामुळे सुट्टीच्या दिवशीही वाहतूक कोंडी होत असून त्याचा मन:स्ताप स्थानिकांना भोगावा लागत आहे. पर्वरीप्रमाणेच पणजी-मडगाव रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी झाली होती. फोंडा बायपास रस्ताही वाहनांनी व्यापलेला दिसत होता. मागील दोन दिवस म्हणजे शुक्रवार व शनिवारी अशीच वाहतूक ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)
राज्यात वाहतुकीचा फज्जा
By admin | Updated: December 29, 2014 01:48 IST