पणजी : पर्यटकांनी वर्षाचे ३६५ ही दिवस गोव्यात यावे, अशा प्रकारची जाहिरात गोवा सरकार जगभर करत असले, तरी येथे रुंद रस्ते, उड्डाण पूल व अन्य साधनसुविधा मात्र पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत. यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. गेले चार दिवस राज्यातील सर्व प्रमुख मार्गांवर व प्रमुख शहरांमध्ये याचा अनुभव येत आहे. पर्यटन डोईजड झाल्याची प्रतिक्रिया गोमंतकीयांमध्ये व्यक्त होत आहे. डिसेंबरचा अखेरचा आठवडा हा प्रचंड गर्दीचाच असतो. या वेळी लाखोच्या संख्येने पर्यटक गोव्यात येत असतात. या वेळीही देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. ते जीवाचा गोवा करू लागले आहेत; पण स्वत:च्या वाहनातून आणि सार्वजनिक वाहनातूनही प्रवास करणाऱ्या गोमंतकीयांना पर्यटकांची अमर्याद गर्दी नकोशी होऊ लागली आहे. रस्त्यांवर वाहतुकीचे नीट व्यवस्थापन होत नसल्याने म्हापशाहून पणजीत किंवा मडगावहून पणजीत येण्यासही प्रवाशांना रस्त्यावर अग्नीदिव्य पार करावे लागते. गेल्या शुक्रवारी सायंकाळपासून पणजीतील मांडवी पुलासह अन्य अनेक भागांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकाही अडकून पडू लागल्या आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्यांनाही जाण्यासाठी वाट मिळत नाही. लोकांना रोजचा प्रवास नकोसा झाला आहे. (खास प्रतिनिधी)
पर्यटन झाले डोईजड
By admin | Updated: December 30, 2014 01:20 IST