पणजी/मडगाव : राज्यात शुक्रवारीही अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. दक्षिण गोव्यात काही भागात पर्जन्यवृष्टी झाली. दुपारनंतर सर्वत्र ढगाळ वातावरण होते. राजधानी पणजी शहरात शुक्रवारी दुपारनंतर वातावरण ढगाळच होते. गार वाराही सुटला होता. आभाळ दाटल्याने पाऊस पडेल, असे वाटत होते; परंतु पाऊस पडला नाही. दक्षिण गोव्यात काणकोणसह अंतर्गत भागात शुक्रवारीही पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. कुंकळ्ळी, गुडी, जांबावली या भागात पाऊस पडला, तर काही प्रमाणात फोंड्यातही पावसाने हजेरी लावली. जानेवारी महिन्यात पडलेल्या या पावसाचा फटका काणकोण भागाला अधिक बसला. काणकोणात अजूनही काही शेतकऱ्यांची मळणी झालेली नाही, तर काहीजणांनी मळणी झाल्यानंतर मळलेले भात शेतावरच ठेवले होते. या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मडगावातही शुक्रवारी सायंकाळी काही ठिकाणी पाऊस पडला. अचानक पावसाच्या सरी येत असल्याने लोकांची तारांबळ उडते. शुक्रवारी दुपारनंतर अनेक भागात सूर्यदर्शन झाले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण होते. नववर्षानिमित्त गोव्यात आलेल्या पर्यटकांची पावसामुळे तारांबळ उडाली. (प्रतिनिधी)
दक्षिणेत पावसाच्या सरी
By admin | Updated: January 3, 2015 01:34 IST