पणजी : लोकसभा निवडणुकीच्यावेळी उत्तर गोवा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी घेतल्यानंतर गांभिर्याने कामच केले नाही, अशा प्रकारच्या तक्रारी रवी नाईक यांच्याविरुद्ध आल्यानंतर गोवा प्रदेश काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने नाईक यांना आता नोटिस बजावली आहे. येत्या आठ दिवसांत या नोटिसीला उत्तर देण्यास नाईक यांना सांगितले आहे. उमेदवारालाच नोटिस पाठवून स्पष्टीकरण मागण्याची काँग्रेसमधील ही पहिली घटना असून राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे. जॉन फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यापासून काँग्रेसमध्ये शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रवी नाईक हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार आहेत. रवी नाईक यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिली; पण भाजपचे श्रीपाद नाईक यांनी त्यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला. नाईक यांनी निवडणुकीच्या काळात कधीच काँग्रेस हाउसमध्ये पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांच्या सगळ््या पत्रकार परिषदा हॉटेलमध्ये झाल्या. एकाही परिषदेच्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा पदाधिकारी त्यांच्यासोबत नव्हते. निवडणूक काळात रवी नाईक आणि काँग्रेस पक्ष संघटना यांच्यात कधीच समन्वय नव्हता. पक्षाने दिलेला निधी रवी नाईक यांनी कशा प्रकारे खर्च केला याचीही प्रदेश काँग्रेस समितीला कल्पना नाही. या सर्व घडामोडींमुळे लोकसभा निवडणूक काळात रवी नाईक यांनी किती गांभिर्याने प्रचार केला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने आलेल्या तक्रारींची दखल काँग्रेसच्या सात सदस्यांच्या शिस्तभंग समितीने घेतली व नाईक यांना नोटिस पाठवली. नाईक हे येत्या आठ दिवसांत या नोटिसीला जे उत्तर देतील त्या उत्तरानुसार त्यांचे राजकीय भवितव्य ठरेल, असे मानले जाते. उत्तराची छाननी करून शिस्तभंग समिती पुढील निर्णय घेणार आहे. रवी नाईक यांनी यापूर्वी आपली भूमिका अँथनी समितीसमोर मांडली आहे. (खास प्रतिनिधी)
रवींना विचारला जाब
By admin | Updated: July 10, 2014 01:27 IST