पणजी : मराठी अकादमी सरकारच्या हाती सोपवून तिच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ देणार नाही. येत्या आॅगस्ट महिन्यात सर्वसाधारण सभेवेळी नवी समिती स्थापन करून अकादमीचे व्यवहार आणि कार्य सुरूच ठेवणार असल्याचे मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी सांगितले. मराठी अकादमी सर्वांसाठी खुली करावी व घटना दुरुस्ती करावी, अशी अट सरकारने घातली होती. त्यानुसार घटना दुरुस्ती करून आम्ही ती राजभाषा खात्याला पाठविली. अजूनही त्याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. वाघ समितीने सादर केलेल्या अहवालातील केवळ ४५ पानेच अकादमीला पाठविण्यात आली आहेत. याचा अर्थ उर्वरित पानांतील गौडबंगाल सरकारला आमच्यासमोर उघडे करावयाचे नाही. सरकारचे हे कामकाज संशयास्पद आहे, असे आजगावकर म्हणाले. अकादमीचे अनुदान गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. त्याचबरोबर मराठीचे कामकाज बंद झाले आहे. मराठीच्या बंद कामकाजाबाबत कोणालाही सोयरसुतक नाही. अकादमी २६व्या वर्षात वाटचाल करीत आहे. एवढ्या वर्षात सरकारने अकादमीची घटना बदलाबाबत हालचाली का केल्या नाहीत? आजपर्यंत अकादमीचे ६00 हून अधिक सदस्य होऊन गेले आहेत. राज्यात इतरही अनेक संस्था आहेत त्यांना बंधने नाहीत तर मग मराठी अकादमीलाच सरकार बंधने का घालत आहे, असा प्रश्नही आजगावकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
गोमंतक मराठी अकादमीवर येत्या महिन्यात नवी समिती
By admin | Updated: July 8, 2014 01:19 IST