पणजी : केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या १ जानेवारी रोजी जुवारी नदीवरील नव्या सहा पदरी पुलाच्या कामाची पायाभरणी केली जाणार आहे. त्या दिवशी गालजीबाग, तळपण आणि माशे या तीन पुलांच्याही कामांची पायाभरणी होईल. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे ही माहिती दिली. यापूर्वी २ जानेवारी रोजी पायाभरणी करावी. असा विचार पुढे आला होता; पण त्या दिवशी गडकरी गोव्यात येऊ शकत नाहीत. येत्या १ जानेवारी रोजी गडकरी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्या उपस्थितीत जुवारी पुलासह काणकोण व मडगाव बायपासच्या कामाची पायाभरणी केली जाईल. जुवारी पुलाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यातील निविदा जारी करण्यात आली असून आज ही निविदा दिल्लीत उघडली जाईल व कंत्राटदार कंपनी निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी एकाच सोहळ्यात केली जाईल. (खास प्रतिनिधी)
जुवारी, तळपण पुलांची १ जानेवारीला पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 01:49 IST