पणजी : सुपरसोनिक पार्टीत ड्रग्सच्या अतिसेवनामुळे बळी पडल्याचा संशय असलेल्या फॅशन डिझायनर ईशा मंत्री (२८) हिच्या निधनाचे गुढ कायम आहे. ईशा पार्टीतच कोसळली असतानाही संगीत थांबवण्यात आले नाही, असा आरोप बॉलिवूड निर्माता महेश भट्ट, तसेच त्यांची कन्या अभिनेत्री पूजा भट्ट यांनी व्टिटरवरून केला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. पार्टी संपल्यानंतरच तिचा मृत्यू झाल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून केला जात आहे. ईशा हिच्या निधनावर बॉलिवूड कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे. पूजा भट्ट व्टिटरवर म्हणते की, इतक्या लवकर आम्हाला सोडून जाणार, असा विचारही केला नव्हता. ईशा पार्टीत कोसळली असतानाही संगीत थांबले नाही. इतक्या आमच्या भावना बोथट बनल्या आहेत का, आमचे मेंदू निर्जीव झाले आहेत का, असे संतप्त सवालही पूजा हिने केले आहेत. युवक-युवतींनी ड्रग्सच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन तिने केले आहे. आयुष्य किमती असते ते वाया घालवू नका, असा संदेशही तिने दिला आहे. ईशा हिने ‘मेरी कॉम’, ‘अंकूर अरोरा मर्डर केस’, ‘डेंजरस इश्क’, ‘हेट स्टोरी २’ या चित्रपटांसाठी डिझायनरचे काम केले आहे. अभिनेत्री रिचा छड्डा हिनेही व्टिटरवर ईशा हिच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना ही धक्कादायक बातमी असल्याचे म्हटले आहे. ईशा हिची शवचिकित्सा करून बुधवारी प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. डॉक्टरांनी निष्कर्ष राखून ठेवले असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तिचा व्हिसेरा रासायनिक पृथ:करणासाठी पाठवला जाणार आहे. (प्रतिनिधी)
ईशा पार्टीत कोसळली तरी संगीत थांबवले नाही!
By admin | Updated: January 2, 2015 01:11 IST