लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. फक्त घोषणा येत्या १७ जानेवारी रोजी होणार आहे.
दामू नाईक हे फातोर्डाचे माजी आमदार असून ते सरचिटणीस या नात्याने पक्षाचे काम करत आहेत. दामू नाईक यांच्याविरोधात पक्षातील एका गटाने राजकारण केले तरी, त्यावर मात करण्यात आता ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे तेच आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील, असे संकेत स्पष्टपणे पक्षाच्या दिल्लीतील काही भाजप नेत्यांनी गोव्यातील नेत्यांना दिले आहेत. यामुळेच काहीजणांनी प्रदेशाध्यक्ष पदावरील आपला दावा मागे घेतला आहे.
१७ रोजी प्रक्रिया
१७ रोजी प्रदेशाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यादिवशीच दामू नाईक हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले जाईल, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.
भंडारी समाजाला 'बळ'
दामू नाईक यांनी कधी समाजाचे कार्ड वापरले नाही, पण ते भंडारी समाजातील असल्याने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणे हे भंडारी समाजासाठीही 'बळ' देणारे आहे. भाजपने आपला उत्तर गोवा जिल्हा अध्यक्षही (दयानंद कारबोटकर) भंडारी समाजातून निवडला आहे. गेली पाच वर्षे प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजातील नेते सदानंद तानावडे यांच्याकडे राहिले. तानावडे यांनी पक्षासाठी उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या पदाला न्याय दिला. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यानंतर गोव्यात भाजपला दुसरा कुणी भंडारी समाजातील प्रदेशाध्यक्ष मिळालेला नाही.