पणजी : पणजीतील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन देणे सर्व पक्षजनांना बंधनकारक आहे. पक्षाच्या निर्णयाच्या विरुद्ध गेल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी दिला. बाबूश मोन्सेरात यांच्या भूमिकेविषयी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पणजी मतदारसंघात होणार असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष एकसंध होऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाबूश मोन्सेरात यांच्या विसंगत विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पक्षीय पद्धतीच्या राजकारणात पक्ष हा श्रेष्ठ असतो. त्यामुळे पक्षाचा आदेश हा सर्वांना बांधील असतो. पक्षासाठी सर्वांना काम करावेच लागणार आहे. पक्षाचा आदेश न मानणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केलेल्या पक्षाच्या आमदारांविरुद्ध सुरू असलेली कारवाई प्रक्रिया कुठे पोहोचली याविषयी विचारले असता आपण सूड उगविण्यासाठी पक्षाची सूत्रे हाती घेतली नसल्याचे सांगून या मुद्द्याला त्यांनी बगल दिली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची नवी दिल्ली वारी आणि १ हजार रुपये कोटींची मागणी यावर भाष्य करताना ते म्हणाले की, या कहाण्या गेली अडीच वर्षे ऐकत आहोत. त्यात नवीन ते काहीच नाही आणि यातून काहीच साध्य होणार नाही, असे ते म्हणाले.
सुरेंद्र फुर्तादोंसाठी काम न केल्यास कारवाई : फालेरो
By admin | Updated: December 29, 2014 01:49 IST