गडचिराेली : काेराेना संकटामुळे बारावीची परीक्षा दाेनवेळा पुढे ढकलण्यात आली. आताही काेराेनासंदर्भात गडचिराेली जिल्हा रेडझाेनमध्ये असून काेराेना महामारीचे संकट पूर्णपणे दूर झाले नाही. त्यामुळे बाेर्डाची परीक्षा हाेणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. तसेच परीक्षेवर काय पर्याय हाेऊ शकताे याची चाचपणी शासन व शिक्षण विभाग करीत आहे. काहीही करा पण यावर लवकर निर्णय घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाॅईंट असताे. मात्र यंदा काेराेना महामारीच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. प्रथम ऑनलाईन अभ्यासक्रम व त्यानंतर दीड ते दाेन महिने प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. पुन्हा काेराेनाची दुसरी लाट आली. नियमित वर्ग बंद पडले. वर्षभर नियमित वर्ग भरलेच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या डाेक्यावरून अभ्यासक्रम गेला. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती बिकट आहे. अनेकांकडे स्मार्ट फाेन नाही. तसेच अहेरी उपविभागातील अनेक गावांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी तसेच कव्हरेजची समस्या आहे. दरम्यान परीक्षेची तारीख ठरल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाला वेग दिला. मात्र दाेनवेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासाबाबतचा उत्साह मावळला. वर्षभर ऑनलाईनच्या माध्यमातून काय शिकलाे हे बरेचजणांना आठवत नाही. त्यामुळे सामाईक परीक्षेचा पर्याय शासनाने निवडावा, अशी काहींची मागणी आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षेतून मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येते, असे काही शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बाॅक्स...
जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी
१३,१४८
..........
मुली - ६,४३०
मुले - ६,७१८
काेट....
काय असू शकताे पर्याय
काेराेना महामारी संकटामुळे यावर्षी बारावीची परीक्षा लांबणीवर पडली. याबाबत आता शासनस्तरावर विचारविनिमय सुरू आहे. काेराेना संसर्गाच्या काळात परीक्षा आयाेजित करण्यापेक्षा दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता येऊ शकते, तसे गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येते. असे केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही.
- अनिल पा. म्हशाखेत्री, अध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था, गडचिराेली
......................
मागील वर्षभरापासून काेराेनामुळे शाळा, काॅलेज प्रत्यक्ष भरले नाही. परिणामी अभ्यासक्रमही व्यवस्थित पूर्ण झाला नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात तर परिस्थिती बिकट आहे. आता बरेच विद्यार्थी अभ्यासक्रमही विसरले नाही. त्यामुळे परीक्षा न घेताच सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करावे, जेणेकरून काेणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय हाेणार नाही.
- समशेरखाॅ पठाण, प्राचार्य, भगवंतराव ज्युनिअर काॅलेज, बाेटेकसा
................
परीक्षा महत्त्वाची आहे पण त्यापेक्षा आराेग्य अधिक महत्त्वाचे आहे. काेराेना संकटाच्या काळात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेणे शक्य झाले नाही. आता परीक्षेचा कालावधी सुद्धा निघून गेला आहे. प्रत्यक्ष वर्ग न भरल्याने विज्ञान, वाणिज्य तसेच कला शाखेतील कठीण विषयाचे बऱ्याच विद्यार्थ्यांना याेग्य आकलन झाले नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेचे मूल्यमापन करून सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले पाहिजे.
- सुनील पाेरेड्डीवार, मुख्याध्यापक, गडचिराेली
...................
विद्यार्थी संभ्रमात
शिक्षण विभागाने सामाईक परीक्षा किंवा सीईटी घेऊन विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे. त्यानुसार पुढील वर्गात प्रवेश घेताना अडचण जाणार नाही. मात्र याबाबतचा निर्णय लवकर हाेणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची अडचण हाेणार नाही.
- प्रवीण रायपुरे
..............
महाविद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेऊन ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण केला. परीक्षेची तारीखही जाहीर झाली हाेती. मात्र काेराेना संकटामुळे परीक्षा झालाची नाही. आता परीक्षेची वेळ निघून गेल्याने अभ्यास करणे कंटाळवाणे झाले आहे. आणखी किती दिवस अभ्यास करत राहायचा हा प्रश्न आहे.
- स्वरा पिपरे
...............
काेराेना संकटाने यावर्षी प्रत्यक्ष वर्ग भरले नाही. ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण झाला. दिवाळीनंतर आपण अभ्यासाला वेग दिला. मात्र परीक्षेची तारीख जाहीर हाेऊनही काेराेनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर अभ्यासाचा मूडच निघून गेला. आता परीक्षा व निकालाबाबत तातडीने निर्णय व्हावा.
- विशाखा गेडाम