जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : खासगी व्यापाऱ्यांकडून लूटएटापल्ली : धान साठवणुकीसाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत तालुक्यातील हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम व आदिवासीबहुल आहेत. या गावातील नागरिकांना शासनाचा हमीभाव मिळावा व खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची होणारी लूट थांबावी यासाठी दरवर्षीच हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले जात होते. परिसरातील बहुतांश शेतकरी याच धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेत होते. मात्र मागील दोन वर्षांच्या कालावधीत धानाची उचल न झाल्याने शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी ज्या धान खरेदी केंद्राकडे धान्य साठवणुकीची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी नाकारली. या नियमाचा फटका हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणच्या खरेदी केंद्रांना बसला. सदर केंद्र सुरूच झाले नाही. धान खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल १ हजार ४१० रूपये दराने धानाची खरेदी केली जाते. मात्र या परिसरात धान खरेदी केंद्रच नसल्याने धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेण्यास सुरू केली आहे. केवळ ८०० ते १००० रूपये प्रती क्विंटल दराने धान खरेदी केली जात आहे. एटापल्ली, गट्टा, कसनसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर धान खरेदी केंद्रांचे अंतर ४० ते ५० किमी पडत असल्याने शेतकरी वर्ग या ठिकाणी धान नेऊ शकत नाही. एटापल्ली तालुक्यात अडीचशे ते तीनशे गावे आहेत. ९५ टक्के नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. धानाचे उत्पादनही प्रचंड प्रमाणात होते. धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. खरेदी केंद्राऐवजी पर्यायी उपाययोजना करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
धान खरेदी केंद्रांअभावी शेतकरी अडचणीत
By admin | Updated: January 10, 2016 01:46 IST