लोकमत विशेषमार्कंडा : चित्रपट पाहण्यासाठी अनेक नवे साधण व नवे चित्रपटगृह निर्माण झाले असले तरी यात्रेमध्ये येणाऱ्या कापडाच्या पडद्यातील टुरिंग टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्याची मजा काही औरच होती. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला मार्र्कंडा यात्रेच्यानिमित्ताने अशी संधी वर्षातून एकदा येत होती. यंदा मात्र पहिल्यांदाच मार्र्कंडा यात्रेकडे टुरिंग टॉकीज व्यावसायिकांनी पाठ फिरविल्याने यामध्ये बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेणाऱ्या रसिकांचा काहीसा हिरमोड झाला आहे.मल्टीस्क्रीन थिअटरच्या जमाण्यात अनेक जुने चित्रपटगृह बंद पडत आहे. नवीन चित्रपट पाहण्यासाठी आज नवे साधण उपलब्ध झालेत. मात्र अशाही परिस्थितीत ग्रामीण भागात टुरिंग टॉकीजमध्ये बसून यात्रेच्यानिमित्ताने चित्रपट पाहणारा एक विशिष्ट वर्ग आजही कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यात महाशिवरात्रीपासून विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मार्र्कंडा येथे यात्रेला प्रारंभ होतो. या यात्रेत वर्धा जिल्ह्यातील सेलू, देवळी येथून फिरते चित्रपटगृह (टुरिंग टॉकीज) दरवर्षी येत होती. यंदा मात्र एकही टुरिंग टॉकीज मार्र्कंडा यात्रेत आलेली नाही. या टॉकीजच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक व नवीन अशा तिनही प्रकारचे व विशेषत: जे मराठी चित्रपट मोठ्या थिएटरमध्ये लागत नाही. ते पाहण्याची नामी संधी प्रेक्षकांना उपलब्ध होत होती. रात्री उशीरापर्यंत या टॉकीजमध्ये खेळ चालायचे व अनेकजण झोपूनही येथे चित्रपट पाहू शकेल, अशी व्यवस्था येथे होती. परंतु पहिल्यांदाच टुरिंग टॉकीजने यात्रेला पाठ दिली आहे.त्यामुळे मार्र्कंडा यात्रेचा माहोल यंदा काहीसा मनोरंजनादृष्टीने थंड असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी रात्री १० वाजेपर्यंतच ध्वनीक्षेपक चालविण्याचा निर्णय झाल्यानंतर पोलीस विभागाने या थिएटरववरही बंधन लादली होती. परंतु त्या परिस्थितीवरही मात करीत टुरिंग टॉकीजने रसिकांचा हिरमोड होऊ दिला नाही. सेलू येथून भास्करराव देवतळे व देवळी येथून कारवटकर हे दोन टुरिंग टॉकीज व्यावसायिक येथे मुक्कामानिशी येऊन चित्रपटाचे खेळ करीत होते. आधुनिक काळात चित्रपटांच्या सीडी बाजारामध्ये उपलब्ध झाल्यानंतरही या व्यवसायात फार उत्पन्न राहिलेले नाही. मात्र लोक आग्रहास्तव यात्रांना भेटी द्यावा लागतात, अशी भावना देवतळे यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.या टुरिंग टॉकीजचाही वर्षातील आठ महिन्यांचा यात्रांचा टाईमटेबल ठरलेला असायचा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना हे नियोजन करावे लागत होते. परंतु यात्रांचा कालावधी कमी होत गेला व टुरिंग टॉकीजच्या व्यवसायालाही रसिक प्रेक्षकांची गर्दी कमी झाली.
टुरिंग टॉकीजने दिली यात्रेला पाठ
By admin | Updated: February 20, 2015 01:06 IST