शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार : पहिल्या वर्गाला विद्यार्थी मिळेना; गडचिरोली प्रकल्पातील स्थितीलोकमत विशेषदिगांबर जवादे गडचिरोलीप्रत्येक गावात सुरू झालेली जिल्हा परिषदेची शाळा, विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या विविध सोयीसवलती व नामांकित शाळेसाठी गेलेले विद्यार्थी यामुळे आश्रमशाळांना पहिल्या वर्गासाठी यावर्षी विद्यार्थ्यांचा दुष्काळ पडला असून काही आश्रमशाळांमध्ये दोन ते तीन विद्यार्थी आहेत. तर काही आश्रमशाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. त्यामुळे पहिला वर्ग संकटात सापडला असून शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आदिवासींच्या मुलांना त्यांच्या परिसरातच शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने आश्रमशाळांची निर्मिती केली. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह निवासाची सोय सुद्धा केली जाते. त्याचबरोबर इतरही खर्च भागविला जातो. परिणामी आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांची रांग लागत होती. मात्र शासनाने ‘गाव तिथे शाळा’ या धोरणाअंतर्गत प्रत्येक गावात प्राथमिकस्तरापर्यंत शाळा सुरू केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर साहित्य सुद्धा जिल्हा परिषद शाळा मोफत पुरविते. जवळपास आश्रमशाळेच्या सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने पालकवर्ग आपल्या पाल्याला आश्रमशाळेत पाठविण्यास तयार होत नाही. गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत एकूण २४ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. प्रत्येक वर्गाची विद्यार्थी संख्या ५० एवढी आहे. यामध्ये ४० विद्यार्थी निवासी स्वरूपाचे राहत असून १० विद्यार्थी अर्धसवलतीचे राहतात. यावर्षी मात्र पहिल्या वर्गात अत्यंत कमी विद्यार्थी मिळाले आहेत. येंगलखेडा आश्रमशाळेत ३, रेगडी १०, सावरगाव ७, मुरूमगाव २१, गोडलवाही १३, मार्र्कं डादेव ३३, पोटेगाव १२, पेंढरी १४, कारवाफा २, सोडे ८, रामगड १५, ग्यारापत्ती १३, अंगारा ६, मसेली २, घाटी ६, कोरची १०, येरमागड ५, कोटगुल आश्रमशाळेत ३ विद्यार्थी आहेत. तर रांगी, भाकरोंडी, कुरंडी माल, भाकरोंडी, सोनसरी या आश्रमशाळांमध्ये एकही विद्यार्थी प्रवेशित नाही. एक वर्गच बंद पडल्याने आश्रमशाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गडचिरोली प्रकल्पातील २४ आश्रमशाळांची प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता १ हजार २०० एवढी असताना पहिल्या वर्गात २३०, दुसऱ्या वर्गात २९१, तिसऱ्या वर्गात ३०२, चवथ्या वर्गात ३६२, पाचव्या वर्गात ५८०, सहाव्या वर्गात ७७४, सातव्या वर्गात ८४६, आठव्या वर्गात ८५०, नवव्या वर्गात २२७ व दहाव्या वर्गात ७८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकंदरीतच प्राथमिक वर्गाला आश्रमशाळांना विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी मिळविण्यासाठी उद्दिष्ट दिले जात असले तरी विद्यार्थीच मिळत नसल्याने विद्यार्थी आणायचे कुठून, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. त्यांच्या नोकरीवरही गदा आहे.नामांकित शाळा प्रवेशाचा फटकाप्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून किमान १ हजार ५०० विद्यार्थी शहरातील नामांकित शाळेत प्रवेशासाठी पाठवावे, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. या निर्देशाची अंमलबजावणी करताना गडचिरोली प्रकल्पातून पहिलेचे ३०० व पाचवीचे ३५२ असे एकूण ६५२ विद्यार्थी नामांकित शाळेसाठी पाठविण्यात आले. तर १६४ विद्यार्थ्यांना नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व आश्रमशाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गेल्याने आश्रमशाळांसाठी विद्यार्थी मिळणार नाही, हे आधीच स्पष्ट होते. प्राथमिक वर्ग बंद करण्याची प्रथम पायरीपहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वय अवघे सहा वर्ष एवढे राहते. या वयात सदर विद्यार्थी स्वत:ची दिनचर्या पूर्ण करू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करू शकेल, एवढा कर्मचारी वर्ग आश्रमशाळेत उपलब्ध नाही. पहिले ते पाचव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आश्रमशाळेत हाल होत होतात. हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्राथमिक वर्ग बंद करण्याचा विचार मागील अनेक वर्षांपासून शासन करीत होता. त्याची अंमलबजावणी करण्याची पहिली पायरी म्हणून नामांकित शाळेचे प्रवेश वाढविण्यात आले आहेत. परिणामी आश्रमशाळा या वर्षी ओस पडल्या आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास प्राथमिक वर्ग आपोआप बंद होतील. दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकाला ३ लाख रूपयांचे वेतन देण्यापेक्षा ते दोन विद्यार्थी १ लाख रूपयात चांगल्या दर्जाच्या शाळेत शिकू शकणार आहेत. हा विचार शासन करीत आहे.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचा दुष्काळ
By admin | Updated: September 12, 2015 01:13 IST