झेलिया गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही
धानोरा : धानोरा या तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जंगलातून पायवाट तुडवत गाव गाठावे लागते. गावाला जातेवेळी दोन मोठमोठे नाले पडतात. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी राहत असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होते. हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. मात्र त्यानंतर रस्त्याचा अभाव आहे.
शाळांमध्ये शौचालयांचा अभाव
गडचिरोली : केंद्र शासनाने प्रत्येक शाळेत शौचालय असणे बंधनकारक करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शौचालय नाही. काही शाळांनी शौचालयाचे बांधकाम सुरू असून ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शौचासाठी बाहेर जावे लागत आहे.
बनावट मापांमुळे ग्राहकांची फसवणूक
गडचिरोली : ग्रामीण भागातील आठवडी बाजार व अन्य ठिकाणी गावोगावी जाऊन खासगी धान्य व इतर वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मापातील त्रुटीमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या धान्याची व किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे.
ग्रामीण भागात व्यायामशाळेची मागणी
गडचिरोली : ग्रामीण भागातील अनेक होतकरू तरुण आहेत. मात्र त्यांना अपुऱ्या सोयी-सुविधा मिळत असल्याने ते पुढे जाऊ शकत नाही. सैनिक भरती तसेच इतर भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुणांना व्यायामशाळेअभावी इतरत्र कसरत करावी लागत असल्याने आधुनिक सोयी-सुविधेपासून वंचित आहेत.
‘नो पार्किंग’चे फलक नावापुरतेच
गडचिरोली : शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘नो-पार्किंग’चे फलक लावले जातात. मात्र नेमका याच फलकासमोर दुचाकी वाहने लावली जातात. हे नियम सामान्य नागरिकांबरोबरच कार्यालयातील कर्मचारीसुद्धा पाळत नाही. त्यामुळे नो-पार्किंगच्या फलकासमोरच दुचाकी वाहने उभी असल्याचे प्रत्येक कार्यालयात दिसून येते.
पूर्णवेळ ग्रंथपाल नियुक्तीस अडचण
गडचिरोली : ५०१ ते १ हजारांपर्यंत एक अर्धवेळ व एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या अनुदानित माध्यमिक शाळेत पूणवेळ ग्रंथपाल पदाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील अनेक अनुदानित शाळेत ग्रंथपालाची पदे भरण्यात आली नाही.
घंटागाडी फिरत नसल्याने साचला कचरा
देसाईगंज : स्थानिक नगर परिषदेच्या घंटागाड्या दररोज फिरण्याऐवजी १५ दिवसांनी लोकांच्या घरासमोर येत आहे. जवळपास कचराकुंड्याही नसल्याने काही नागरिक नाल्यांमध्ये कचरा टाकत आहेत. परिणामी नाल्या तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तलावातील गाळ उपसा
गडचिराेली : मागील अनेक वर्षांपासून तलावांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे तलावांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. काही तलावांमध्ये अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे तलावातील गाळ उपसा करून खोलीकरण करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे. तलावांचे खोलीकरण झाल्यास वन्यप्राण्यांचीही तहाण भागण्यास मदत होईल व स्थानिक नागरिकांना रोजगारही मिळेल.
खुल्या डीपींना सुरक्षा कवच लावा
धानोरा : तालुक्याच्या ग्रामीण भागासह जिल्ह्याच्या दुर्गम भागात अनेक गावांमध्ये डीपी खुल्या अवस्थेत आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या खुल्या डीपीमधून होत आहे. पावसाळ्यात अशा डीपीतून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.