बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना मधुमेहाचा आजार बळावू लागला आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर उपायांबराेबरच ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीपासून बनविलेले इतर पदार्थ खाण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागाबराेबरच शहरातील नागरिकांकडूनही ज्वारीची मागणी वाढत आहे. त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने ज्वारीला इतर पिकांएवढाच भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. खुल्या बाजारपेठेत ज्वारी दर्जानुसार ३० ते ४० रुपये किलाेदरम्यान विकली जात आहे. म्हणजेच, प्रत्यक्ष शेतकऱ्याला जवळपास ३००० ते ३,५०० रुपये एवढा भाव मिळत आहे. हे बघून काही शेतकरी ज्वारी पिकाची लागवड करीत आहेत. या पिकाखालील क्षेत्र वाढेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बाॅक्स.....
ज्वारी पचनाला सोपी
शास्त्रीयदृष्ट्या ज्वारीचे महत्त्व वाढले आहे. श्रीमंतांचा आहार समजल्या जाणाऱ्या गव्हापेक्षा अर्ध्या अधिक किमतीत विकली जाणारी ज्वारी आता दीडपट महाग झाली आहे. पूर्वी सामान्य शेतकऱ्यांच्या घरात ज्वारी, बाजरीच्या भाकरी थापल्या जायच्या तेव्हा गहू महाग असल्याने चपात्या खाणे हे संपन्न घरांचे लक्षण होते. आहारात ज्वारी गरिबांसाठी व गहू श्रीमंतांसाठी असे वर्गीकरण व्हायचे; पण काळानुसार लोकांना व्यायाम आरोग्यासाठी वेळ मिळत नसल्याने सहज पचनारे अन्न घेण्याचा सल्ला डाॅक्टर व आहारतज्ज्ञांकडून मिळायला लागला. गव्हाच्या तुलनेत ज्वारीचे पदार्थ पचनारे असल्याने आरोग्यही सुदृढ राहायचे. मधुमेह, स्थूलता टाळण्यासाठी आणि ज्वारीच्या पोषण मूल्यांबाबत जागृती झाल्याने ज्वारीच्या सेवनाचे प्रमाण वाढले. सध्या हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय आदी ठिकाणीही ज्वारीच्या भाकरीला पसंती मिळत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे गव्हाच्या तुलनेत जास्त किंमत ज्वारीला मिळत आहे.