विजय वडेट्टीवार यांचा आरोप : दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील मद्दीकुंठा रेतीघाटावरून हजारो ब्रॉस रेतीची तेलंगणा राज्यातील वरंगल, करीमनगर, हैद्राबाद या शहरांमध्ये अवैध रेती तस्करी केली जात आहे. आतापर्यंत ६ हजार ब्रॉसपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करून तेलंगणा राज्यात विक्री करण्यात आली आहे. महसूल विभाग व खनिकर्म विभागाच्या आशीर्वादाने सदर तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यासंपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर मोफाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून गोदावरी नदी आहे. तेलंगणा सीमेकडे असलेल्या नदीपात्रात पाणी असल्याने त्यातून रेतीचे उत्खनन करता येत नाही. त्यामुळे तेलंगणा राज्यातील रेती तस्करांनी गडचिरोली जिल्ह्यातील महसूल आणि खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून मद्दीकुंठा रेती घाटातून राजरोसपणे रेतीचे उत्खनन सुरू केले आहे. रेती घाटातून उत्खनन केलेली जवळपास ६ हजार ब्रॉस रेती नदी घाटापासून जवळच असलेल्या एका शेतामध्ये ठेवण्यात आली आहे. महसूल विभागाने सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गोदावरी नदीपात्रातील नगरम १ व २, मद्दीकुंठा, तेकराटाला, जाफ्राबाद, रेगुंठा माल, मुकड्डीकुठा, मुत्ताराममाल, तरडा, कोठामाल, अंकिता माल यासह १४ रेतीघाटांची ४१ कोटी ८५ लाख ९७ हजार ५०० रूपये किंमत ठेवून लिलाव करण्याचा प्रस्ताव सिरोंचाचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव तयार करण्यात सिरोंचा येथील एका नायब तहसीलदाराने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. हा नायब तहसीलदार तलाठीपासून नायब तहसीलदार पदापर्यंत पदोन्नती घेत फक्त सिरोंचा परिसरातच नोकरी केली आहे. रेतीच तस्करी करणाऱ्या कंत्राटदारासोबत साठगाठ असल्याने त्याची बदली होऊनसुद्धा त्याला पुन्हा सिरोंचा येथेच ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महसूल आयुक्ताकडे पाठविला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महसूल, खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या संगणमताने रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जवळच्या शेतात रेतीचा साठा मद्दीकुंठा रेती घाटातून रेतीचा उपसा केल्यानंतर सदर रेती पुलापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका शेतात साठवून ठेवली जाते. सध्या या शेतात जवळपास ६ हजार ब्रॉस रेतीचा साठा करण्यात आला आहे. त्यानंतर या रेतीची पुलावरून वरंगल, करिमनगर, हैद्राबाद या शहरांमध्ये तस्करी केली जाते. यातून कंत्राटदार कोट्यवधी रूपये कमवित आहे. मात्र महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. फिटनेस सर्टिफिकेट नसतानाही पुलावरून अवजड वाहतूक गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. तसेच या पुलाचे फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा अद्याप प्राप्त झाले नाही. अशाही परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने रेती तस्करीची अवजड वाहने या पुलावरून नेली जात आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. पूल कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शासनाचेही कोट्यवधींचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे रेती तस्करी करणाऱ्या जड वाहनांना या पुलावरून वाहतूकीस प्रतिबंध घालावा, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
गोदावरीतून रेतीची तेलंगणात तस्करी
By admin | Updated: August 19, 2016 00:54 IST