रामकृष्णपूर येथील कृपाचार्य कृष्णपद सेन यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १४(१) (ज-३)अंतर्गत सरपंच मिस्त्री यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज २९ एप्रिल २०२१ रोजी दाखल केला होता. याप्रकरणी मंडळ अधिकारी येनापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालात दिनेश मिस्त्री यांचे काका मनोरंजन सन्यासी मिस्त्री हे रामकृष्णपूर येथील भूमापन क्रमांक ७ व ५ मध्ये जवळपास २.२० हेक्टर आर क्षेत्रात मागील २० ते २५ वर्षांपासून अतिक्रमण करून वहीवाट करत असल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी गावातील ५२ नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले. वडील व काकाचे शासकीय जागेवर अतिक्रमण असून दोघे भाऊ मिळून वहिवाट करीत होते. पण वडील वयोवृद्ध झाल्याने त्यांच्या हिश्याची अतिक्रमित शेतजमीन दिनेश मिस्त्री कसत असल्याचे दिसून आले. या अतिक्रमित जमिनीचा कायमस्वरूपी पट्टा मिळण्यासाठी शासनाकडे अर्जसुद्धा केला आहे. या बाबींमुळे त्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे हे सिद्ध होत असल्याने जिल्हाधिकारी सिंगला यांनी सरपंच दिनेश मिस्त्री यांचे सदस्यत्व रद्द केले.