कुरुड : रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने रोष व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार हमीचे काम मिळवून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
ग्रामरोजगार सेवक मानधन तत्त्वावर काम करीत आहेत. मस्टर काढणे, जॉब कार्ड बनविण्यासाठी तालुक्याला भेट देणे, ग्रामसेवक यांना वेळोवेळी मदत करणे, नागरिकांना रोजगार हमीचे काम मिळवून देणे, कामाचे मस्टर भरणे, पंचायत समितीला वेळोवेळी याबाबतची माहिती देणे यांसारखी कामे रोजगार सेवक करीत असतात. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मजुरांची रक्कम वेळेवर मिळावी म्हणून रोजगार सेवक मस्टर भरून पंचायत समितीला देत असतो; पण सहा महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन मिळाले नसल्याची माहिती आहे.
ऑगस्ट महिन्यात मानधन मिळावे यासाठी १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले; पण याचा काहीच उपयोग झाला नाही. काही दिवसांत २० ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा मार्ग निवडला; पण अजूनही ग्रामरोजगार सेवकाचे मानधन न मिळाल्याने सर्व कामे ठप्प आहेत. रोजगार सेवकांना जेव्हापर्यंत मानधन मिळत नाही, तेव्हापर्यंत बेमुदत काम बंद राहील, अशी माहिती ग्रामरोजगार सेवक संघटनेने दिली आहे.