सिराेंचा : शहराच्या प्रभाग क्र.४ मध्ये सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा याेग्य निचरा हाेत नसल्याची समस्या नागरिकांनी सांगताच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी थेट प्रभागात जाऊन समस्या जाणून घेतली. दरम्यान, जेसीबीच्या माध्यमातून पाण्याची वाट माेकळी करून दिली. सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न तातडीने मार्गी लावल्यामुळे वाॅर्डातील नागरिकांना दिलासा मिळाला.
सिराेंचा नगरपंचायत क्षेत्रात रस्ते, नाल्या व इतर विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांची पाहणी मुख्याधिकारी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन करीत आहेत. याशिवाय शहराच्या विविध प्रभागांत नागरिकांच्या काय समस्या आहेत. रस्ते, नाली, वीज, पाणी आदींचा आढावा घेऊन नागरिकांशी चर्चा करून ते समजून घेत आहेत. सिराेंचा शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे प्रभाग क्र.४ मध्ये पाणी अडकून पडले. याचा त्रास प्रभागातील नागरिकांना हाेत हाेता. त्यांनी ही समस्या नगरपंचायत प्रशासनाकडे मांडली. यावर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी प्रत्यक्ष वाॅर्डात जाऊन पाहणी केली. जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही समस्या मार्गी लावली. पाण्याचा प्रवाह माेकळा केला.
यावेळी नगरपंचायतीचे अभियंता घाेडे, माजी नगरसेवक बबलू पाशा तसेच वाॅर्डातील बहुसंख्य नागरिक उपस्थित हाेते.
बाॅक्स...
नाल्यांचा उपसा करण्याची मागणी
सिराेंचा शहरातील तसेच नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे. आता पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्यांमधील पाणी पाऊस आल्यावर रस्त्यावरून वाहत आहे. नाली उपसण्याचे काम करण्यात आले. मात्र, काही ठिकाणच्या नाल्या याेग्यरीत्या स्वच्छ केल्या नाहीत.