दुष्काळातही पीक जगले : पलसगड येथील शेतकऱ्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रमकुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील शेतकऱ्यांनी प्रा. नीलकंठ लोनबले यांच्या मार्गदर्शनात पॉलिबांधची निर्मिती केली. या बंधाऱ्यामुळे शेकडो हेक्टर शेती दुष्काळाच्या परिस्थितीतही हिरवीगार राहिली आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे. पलसगड गावाजवळून सती नदी वाहते. सती नदीच्या काठाला शेकडो हेक्टर शेती आहे. पावसाळ्यानंतर या नदीचे पाणी कमी होत असून एका बाजुला धार पडते. मात्र सदर पाणी सुद्धा अडविण्यासाठी कोणतीच उपाययोजना नसल्याने हे पाणी पुढे वाहून जात होते. त्यामुळे नदी काठाजवळची शेकडो हेक्टर जमिनीतील पिके पाण्याअभावी करपत होती. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती झाली होती. दरवर्षीच पीक करपत असल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला होता. कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. नीलकंठ लोनबले यांनी सती नदीच्या पात्राची पाहणी केली. या नदीवर पॉलिबांधाची निर्मिती अत्यंत कमी खर्चात करणे शक्य असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही बाब पलसगड येथील शेतकरी डाकराम कसारे, वासुदेव तुलावी, काशिना नैताम, मसरू नैताम, कैलास नैताम यांच्या लक्षात आणून दिली. प्रा. लोनबले यांची संकल्पना शेतकऱ्यांना रूचल्याने बैलबंडीने रेती आणून सती नदीच्या पात्रात पॉलिबांधाची निर्मिती केली. अवघ्या चार दिवसांत सदर बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले. बंधाऱ्यासाठी नदीपात्रातीलच रेतीचा वापर करण्यात आला. मात्र रेती सछिद्र राहत असल्याने त्यातून पाणी झिरपते. रेतीच्या आतमध्ये पॉलिथीनचा वापर केल्यास सदर पाणी झिरपत नाही. त्याचबरोबर ओलावा राहत असल्याने पॉलिथीनही खराब होत नाही. या पद्धतीने बंधाऱ्याची निर्मिती केल्यानंतर पाणी साचले आहे. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असतानाही या परिसरातील धानाचे पीक वाचले आहे. त्याचबरोबर हे पाणी पुढे मार्च महिन्यापर्यंत टिकणार असल्याने दुबारपिकही घेणे शक्य होणार आहे. (तालुका प्रतिनिधी) एक किमीवर पसरले पाणीपॉलिबंधाऱ्यामुळे सती नदीच्या पात्रात सुमारे एक किमीवर पाणी पसरले आहे. एक किमीच्या परिसरात हजारो हेक्टर शेती आहे. या शेतीला आता पाणी देणे शक्य होणार आहे. बंधाऱ्याजवळ चार ते पाच फूट पाणी साचले आहे. आजपर्यंत या भागातील फार कमी शेतकरी भाजीपाला किंवा इतर पिकांचे उत्पादन घेत होते. पाणी नसल्याने पीक कसे घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत होता. मात्र बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.प्रेरणादायी उपक्रमगडचिरोली जिल्ह्यात शेकडो नदी, नाले आहेत. या नाल्यांवर अशा प्रकारच्या छोटेखानी बंधाऱ्याची निर्मिती झाल्यास सिंचनाचा प्रश्न आपोआप मिटेल. यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी व फायद्याचा आहे, अशी प्रतिक्रिया प्रा. लोनबले यांनी व्यक्त केली.
पॉलिबंधाऱ्याने शेकडो हेक्टर शेतीला मिळाले पाणी
By admin | Updated: November 7, 2015 01:26 IST