चामोर्शी तालुक्यात वागदरातही कारवाई : आरमोरीत वाहनासह ९० पेट्या जप्तगडचिरोली : चामोर्शी व आरमोरी पोलिसांनी मंगळवारी व बुधवारी या दोन दिवशी अवैध दारूविक्रेत्यांविरोधात धडक मोहीम राबविली. आरमोरी पोलिसांनी कुरखेडा- वैरागड आरमोरी मार्गे चारचाकी वाहन व ९० पेट्या दारू जप्त केली. चामोर्शी पोलिसांनी वागदरा येथून २४ हजार रूपयांची दारू जप्त केली. याशिवाय आरमोरी पोलिसांनी शहरातील सट्टापट्टी अड्यावरही धाड टाकून आरोपींवर कारवाई केली. मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास कुरखेडावरून वैरागड मार्गे आरमोरी येथे चारचाकी वाहनाने दारूची वाहतुक होत असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली. तत्काळ पीएसआय बन्सोडे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी या मार्गावर पाळत ठेवून दारू घेऊन येणाऱ्या एमएच ३४ के ५७७५ क्रमांकाच्या महेंद्र बोलोरा वाहनाला थांबविले. तपासणी केल्यानंतर येथे ९० पेट्या दारू आढळून आली. पोलिसांनी सदर दारू जप्त केली. व वाहनचालक मोरेश्वर आत्माराम मानागुळदे याला अटक केली. त्याचा सहकारी रामेश्वर चिंतामण मारबते हा फरार झाला. दोघांच्याही विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चामोर्शी पोलिसांनी वागदरा येथे बारिकराव सोमा आत्राम याच्या घरी धाड टाकून तेथून २४ हजार रूपयांची दारू बुधवारी रात्रीच्या सुमारास जप्त केली. आत्राम याला अटक करून त्याच्याविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)सट्ट्याच्या अड्ड्यावरून रोख रक्कम जप्तआरमोरी पोलिसांनी मंगळवारी नेहरू चौकातील हरिश्चंद्र यादव तिजारे यांच्या पानटपरीवर धाड टाकली असता, अनेक लोक या ठिकाणी कुबेर व राजधानी नावाचा सट्टापट्टी जुगार खेळत होते. पोलिसांनी येथून सट्टापट्टी खेळण्याचे कोरे कागद, कार्बन, पेन व रोख ५०२ रूपये जप्त केले. तसेच पोलिसांनी ताडुरवार नगरात गजानन दुधबळे यांच्या पानटपरीवर धाड टाकून तेथून रोख ५०२ रूपये व सट्टापट्टीचे साहित्य जप्त केले. आरोपींविरोधात जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची सट्टापट्टी व दारूअड्यावर धाड
By admin | Updated: June 30, 2016 01:35 IST