पणजी : सरकारने यापूर्वी गोमंतक मराठी अकादमीला दिलेले बारा लाख रुपयांचे अर्र्थसाह्य आता सरकारला व्याजासह परत करा, असा आदेश जारी झाला आहे. राजभाषा संचालनालयाने तसे आदेशवजा पत्र मराठी अकादमीस शुक्रवारी पाठवले. दरम्यान, आपल्याला हवी तशी सरकारी मराठी अकादमी स्थापन करण्याचा हालचाली गतीने सुरू झाल्या आहेत. मराठी अकादमीची दारे राज्यातील सर्व मराठीप्रेमींसाठी खुली व्हावीत व अकादमीचे सदस्यत्वही सर्व मराठीप्रेमींना प्राप्त व्हावे म्हणून सरकारने अकादमीला घटना दुरुस्त करण्यास सांगितले होते; पण अकादमीच्या समितीने नावापुरतीच घटना दुरुस्ती केली, असे राजभाषा संचालनालयाचे मत बनले आहे. यामुळे यापुढे अकादमीला एकाही पैशाचे अनुदान द्यायचे नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांत बारा लाख सरकारच्या तिजोरीत जमा करा, असे मराठी अकादमीला कळविल्याने खळबळ उडाली आहे. (खास प्रतिनिधी)
१२ लाख व्याजासह परत करा
By admin | Updated: June 21, 2014 01:45 IST