भामरागड : शहरातील बहुतांश औषधविक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते, याचा थांगपत्ता लागत नाही. औषधांचे बिल न देणाऱ्या लाेकांवर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.
रेपनपल्ली पूल जीर्ण
कमलापूर : परिसरातील कमलापूर-रेपनपल्लीदरम्यान असलेल्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कमलापूर परिसरातील छल्लेवाडा, कोडसेलगुडम, तारीगुडम, दामरंचा, आशा, नैनगुडम, मांड्रा, लिंगमपल्ली आदी गावांतील नागरिक या पुलावरून ये-जा करतात.
आलापल्लीतील थ्री-जी सेवा नावापुरतीच
आलापल्ली : येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिला जात आहे. थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे.
एकोडी-वेलतूर मार्गावर काटेरी झुडुपे कायमच
चामोर्शी : तालुक्यातील एकोडी-वेलतूर तुकूममार्गावरील दुतर्फा काटेरी झुडुपांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे सदर झुडुपे तोडण्याची गरज आहे. फांद्या रस्त्यावर येत असल्याने विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसण्यास अडथळा होत आहे.
गॅस रिफिलिंग व्यवस्थेत सुधारणा करा
देसाईगंज : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅसकनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, गॅस रिफिलिंगची व्यवस्था मोठ्या गावात दूर अंतरावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागताे.
अल्पवयीनांकडे वाहने
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गतिराेधकाची प्रतीक्षा
आष्टी : घोट व चामोर्शीकडे जाणा-या मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
शबरी घरकुल मिळेना
गडचिरोली : आदिवासी नागरिकांसाठी शबरी घरकुल योजना आहे. या योजनेंतर्गत गरजू व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. मात्र, आदिवासी भागातील अनेक नागरिक सदर योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे गरजू लाभार्थ्यांना वगळण्याचे प्रकार स्थानिक स्तरावर घडतात.
खुटगावचा निवारा बकाल
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी आहे.
इमारतीजवळ राेहित्र
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतींच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यास याची जबाबदारी काेण घेणार, हासुद्धा प्रश्नच आहे.
रांगी मार्गालगत झुडुपे
वैरागड : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यांवर अनेक झाडे रस्त्यांवर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वनविभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडुपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे.
भिकारमौशी मार्ग खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या आहेत. शालेय विद्यार्थी व नागरिक येथून आवागमन करतात.
बांधांचा प्रस्ताव धूळखात
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.
बायोगॅस अनुदान ताेकडे
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्च गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्या प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग होणे आवश्यक आहे.
राजोलीचा पूल अर्धवट
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापावे लागते.