नागरिकांमध्ये तीव्र रोष : शहरात पसरले आहे घाणीचे साम्राज्यनागभूषणम चकिनारपूवार सिरोंचाब्रिटिशांच्या कालावधीत नावारूपास आलेले व जिल्ह्यात ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या सिरोंचा शहराची दूरवस्था झाली असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाविषयी स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ब्रिटिशांच्या कालावधीत सिरोंचा हे प्रमुख शहर होते. ब्रिटिश सिरोंचा येथूनच परिसराचा कारभार सांभाळत होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांना राहण्याची आलिशान व्यवस्था व्हावी, यासाठी या ठिकाणी विश्रामगृह बांधण्यात आले होते. ६० वर्षापूर्वीच ब्रिटिशांची राजवट गेली असली तरी ब्रिटिश राजवटीची आठवण देणारा विश्रामगृह मात्र या ठिकाणी आजही कायम आहे. अनेक पर्यटक सिरोंचा परिसरात आल्यानंतर या विश्रामगृहाला अवश्य भेट देऊन त्या ठिकाणी विश्रांतीस राहतात. अशा या ऐतिहासिक वैभव प्राप्त झालेल्या गावाच्या विकासाकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मागील ४ वर्षात ग्रामपंचायत प्रशासनाने विकासाची वाट लावली आहेत. प्रत्येक वार्डातील रस्त्यावर व नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसू लागले आहे. याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी नागरिक आपले काहीच करू शकत नाही या अविर्भावात वावरू लागले आहेत. शहरातील संपूर्ण नाल्या तुंबल्या आहेत. मागील ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने ग्रामपंचायतीची पोल उघड केली आहे. पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने सदर पाणी नागरिकांच्या अंगणात किंवा रस्त्यावर जमा झाले आहे. काही वार्डात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बहुतांश विकासाची कामे ठेकेदारी पध्दतीने केली जात असल्याने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी कमिशन घेऊन मोकळे होत आहेत. बहुतांश पैसे कमीशन देण्यातच खर्च होत असल्याने व ठेकेदाराला बोलणाराही कोणीही उरला नसल्याने मन वागेल त्या पध्दतीने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीने नाल्यांचा उपसा करणे आवश्यक आहे. मात्र या गंभीर बाबीकडे सिरोंचा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके निर्माण झाले आहेत. यातून मलेरिया, डेंग्यू, अतिसार रोगांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे.
इतिहासकालीन सिरोंचाची दुरवस्था
By admin | Updated: July 14, 2014 02:07 IST