लोकमत न्यूज नेटवर्ककुरुड : देसाईगंज उपविभागीय अभियंता इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन सिंचन विभागांतर्गत येणाऱ्या कुरुडच्या गजानन पाणी वापर संस्थेने सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून लॉकडाऊनमध्ये पाणी वापराची थकबाकी सक्तीने वसूल केली. मात्र वसूल केलेल्या पाणसाऱ्याची दहा टक्के रक्कम पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे जमा न करताच परस्पर खर्च केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.उपविभागीय अभियंता इटियाडोह सिंचन विभागाच्या नियंत्रणात कुरुड येथे गजानन पाणी वाटप संस्थेची निर्मिती झाली. शेती वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कुरुड व जुनी वडसा शेतशिवारातील सिंचन कालव्याचे पाणी आवश्यकतेनुसार खरीप व रबी हंगामात उपलब्ध करून दिले जाते. खरीप व रबी हंगामात पाणी वापराचे वेगवेगळे दर आहेत. खरीप हंगामाच्या मानाने उन्हाळी पिकांकरिता अधिक दर आहेत. परंतु अनेकदा नापिकीमुळे शेतकरी पाणसारा भरू शकत नाही. परिणाामी बरीच थकबाकी जमा होते. मागील पाच वर्षांपासून रबी हंगामासाठी इटियाडोह सिंचन प्रकल्पाकडून सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. यावर्षी रबी हंगामासाठी सिंचनाची सोय करुन देण्यात आली असली तरी लॉकडाऊनमुळे शेतकºयांच्या हाताला कामच नसल्याने ते अडचणीत आहेत. पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. या असहायतेचा फायदा घेत, गजानन पाणी वापर संस्थेने सक्तीने वसुली करण्याचा सपाटा लावला. वसूल केलेल्या रकमेची पावतीसुद्धा न देता त्याची नोंदसुद्धा रोकडवहीत घेतली नाही, असे सांगितले जात आहे. तथापि, पाणी वापर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इटियाडोह पाटबंधारे उपविभागीय अभियंत्यांना अंधारात ठेवून नियमबाह्य ठराव घेत कार्यक्षेत्रातील थकबाकीदारांकडून सक्तीने वसुली करीत दहा टक्के रक्कम आपापसात परस्पर वाटप केली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करीत पाणी वापर समिती बरखास्त करुन त्यांच्यावरी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कुरुड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.समितीने ठराव घेतला हे खरे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांकडून ९ लाख रुपये जमा केले आहेत. समितीची चांगली कामगिरी पाहून विरोधक आरोप करुन बदनाम करीत आहेत. आम्ही कोणाकडूनही सक्तीने वसुली केली नाही.- रवींद्र रणदिवे, सचिव,गजानन पाणी वापर संस्था कुरुडपाणी वापर समितीने वसूल केलेल्या कराची दहा टक्के रक्कम व्यक्तीश: खर्च करता येत नाही. त्यामुळे कुरुडच्या गजानन पाणी वापर संस्थेने घेतलेला ठराव रद्द होण्यास पात्र असून तो नामंजूर करण्यात आला आहे.- टी. के. मेंढे,प्रभारी उपविभागीय अभियंता, इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन सिंचन कार्यालय,देसाईगंज.
पाणीकराची १० टक्के रक्कम आपसात वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST
शेती वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कुरुड व जुनी वडसा शेतशिवारातील सिंचन कालव्याचे पाणी आवश्यकतेनुसार खरीप व रबी हंगामात उपलब्ध करून दिले जाते. खरीप व रबी हंगामात पाणी वापराचे वेगवेगळे दर आहेत. खरीप हंगामाच्या मानाने उन्हाळी पिकांकरिता अधिक दर आहेत.
पाणीकराची १० टक्के रक्कम आपसात वाटप
ठळक मुद्देरोकडवहीत नोंदच नाही । कुरुडच्या गजानन पाणी वापर संस्थेचा नियमबाह्य ठराव