४० कोटींचे कर्ज वाटप : जिल्हाभरातील १० हजार ४२९ शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : खरीप हंगामाच्या कामांना वेग आला असला तरी कर्ज वितरणाची गती मात्र धिम्मीच असल्याचे दिसून येते. १० जून पर्यंत जिल्हाभरातील फक्त १० हजार ४२९ शेतकऱ्यांना ३९ कोटी २९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. बियाणे, खते व मजुरांची मजुरी सुध्दा वाढली आहे. शेतीसाठी लाखो रूपये खर्च येतो. एवढा पैसा शेतकऱ्यांजवळ राहत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सावकाराकडून किंवा बचतगटाकडून कर्ज काढावे लागते. हे कर्ज अत्यंत महाग राहत असल्याने ते शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे बँकांनी कर्ज वितरण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सुध्दा देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात केले आहे. मान्सूनचे आगमण होताच पेरणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदीस सुरूवात केली आहे. यासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे कर्ज काढण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये जात आहेत. मात्र विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळेच कर्ज वितरणाची गती अत्यंत धिम्मी असल्याचे दिसून येते. जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ११८ कोटी १ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट चालू खरीप हंगामात देण्यात आले आहे. मात्र १० जूनपर्यंत केवळ ३९ कोटी २९ लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. १० हजार ४२९ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यातही आजपर्यंत झालेल्या कर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुमारे २५ कोटी ६० लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. (नगर प्रतिनिधी)मेळाव्यांच्या माध्यमातून जनजागृतीबँकांकडून कर्ज घेण्याची पध्दती, कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले याबाबतची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे बिनव्याजी कर्ज मिळत असतानाही शेतकरी सावकार किंवा बचत गटांकडून जास्त व्याजाचे कर्ज घेतात. मात्र बँकेकडून कर्ज घेत नाही. कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक बँक मोठ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहे. या मेळाव्यामध्ये महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलविले जात आहे. तिथेच दाखले घेऊन कर्जाबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत.
कर्ज वितरण कासवगतीनेच
By admin | Updated: June 17, 2016 01:19 IST