गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या १० नद्या वाहतात. या नदी काठावर जवळजवळ ४२ गावे आहेत. जिल्ह्यात सरासरी १५०० ते २००० मिमीच्या वर पाऊस पडतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यात ४२ गावांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या पाच मोठ्या नद्या वाहतात. त्याचबरोबर बांडे, पर्लकोटा, गाढवी, खोब्रागडी, पाल, कठाणी, दिना यासुद्धा नद्या आहेत. जिल्ह्यातील शेकडो गावे नदींच्या काठी किंवा खोलगट भागामध्ये वसली आहेत. पावसाळ्यादरम्यान पावसाचे प्रमाण जास्त झाल्यानंतर या गावांमध्ये पुराचे पाणी शिरून जीवित व आर्थिक हानी होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. मागील वर्षी तर सततच्या पुरामुळे सुमारे चार महिने जनजीवन विस्कळीत झाले होते. दरवर्षी जिल्ह्यातील जवळपास ४२ गावांना पुराचा फटका बसतो. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, गोमणी, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, कळमगाव, आष्टी, अनखोडा, आरमोरी तालुक्यातील वघाळा, शिवणी बु., सायगाव, डोंगरसावंगी, वैरागड, देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज, विसोरा, सावंगी, अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुक्यातील कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, गडअहेरी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुक्यातील हिंदूर, हिक्केर, झारेवाडा, भामरागड तालुक्यातील भामरागड, सिरोंचा तालुक्यातील मृदूकृष्णापूर, मोयाबीनपेठा, दर्शेवाडा, परसेवाडा, अंकिसा, पेडलाया, असरअल्ली, सोमनूर या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये यापूर्वी पूर येऊन मोठी जीवित व आर्थिक हानी झाली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात पूर येण्यापूर्वीच नागरिकांना सजग करता यावे, नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविता यावे, मागील वर्षीप्रमाणे जीवितहानी होऊ नये तसेच जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर व्यवस्थापनाबाबत उपाययोजना कराव्यात, असे निर्देश शासनाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ४२ गावांना पुराचा धोका
By admin | Updated: May 13, 2015 01:17 IST