गोवारी समाजाचा सण : दिवाळी पाडव्याच्या दिवशी केली जाते गोवर्धन पूजाप्रदीप बोडणे वैरागडगुरे राखणे हा प्रमुख व परंपरागत व्यवसाय असलेल्या वैरागड येथील गोवारी समाजाच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या दिवशी ढालीची पूजा करून गोवर्धन सण साजरा केला जातो. या सणाला मागील १०० वर्षांची परंपरा लाभली आहे व ही परंपरात आजही विनाखंड चालविली जात आहे. रानावणात गुरांची राखण करताना कधीकधी गोवारी समाजाला स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागतो. हिंस्त्र पशू, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ढाल आपल्या जीवाचे संरक्षण करते, अशी आख्यायिका यामागे सांगितली जाते. या ढाल पूजनाच्या अनेक मान्यता सांगितल्या जातात. एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व स्नेहाचे नाते निर्माण करण्यास ढालीला प्रतीक मानले जाते. ज्या लाकडी खांबाला चार तोंड राहतात, ती स्त्री व ज्या लाकडी खांबाला दोन तोंड राहतात ती पुरूष मानल्या जाते. गीरजा व गौरी असे पौराणिक नाव ठेवण्यात आले आहे. त्यांना शंकर व पार्वती यांचे रूप मानले जाते. कुलदेवतांचे स्मरण व्हावे, यासाठीसुद्धा दरवर्षी गोवारी समाजाच्या वतीने गोवर्धन पूजेचे आयोजन करण्यात येते. गोवर्धन पूजेमध्ये गायीची पूजा झाल्यानंतर ढालीच्या पूजनाला सुरुवात होते. गेरूने आधीच रंगविलेले लोकडी खांब व त्यावर गुच्छ करून बांधलेले मोरपीस ढालीच्या खांबाबरोबर मोहफुलाच्या झाडाची एक फांदी व त्यावर सुंदर सजविलेली शेली चढविली जाते. सजविलेल्या ढालीची मिरवणूक काढली जात होती. मात्र मागील काही वर्षांपासून मिरवणूक काढणे बंद झाले असले तरी ढालीचे पूजन मात्र केले जात आहे. परंपरेने गुरे राखून आपला उदनिर्वाह करणाऱ्या गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला आहे. मात्र शासनाच्या योजनांचा लाभ या समाजापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे बदलत्या जीवनपद्धतीत हा समाज स्वत:च्या हक्कांसाठी अजूनही संघर्ष करीत आहे. अस्तित्वाची लढाई लढत आहे. केवळ मत मागण्यापुरताच या समाजाचा वापर राजकीय लोकांकडून केला जात आहे, अशी खंत या समाजातील नागरिकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. दांडपट्टा चालवून काढली जात होती मिरवणूकदोन कुटुंबातील ढाली मिळून गावातून मिरवणूक काढली जाते. मजबूत बांधा असलेली गोवारी समाजातील नागरिक कमरेला दुपट्टा बांधतात. या कमरेच्या दुपट्ट्यात बेंबीजवळ ढालीचा खालचा टोक ठेवला जातो आणि वाजतगाजत ढालीची मिरवणूक काढली जाते. ढालीसमोर शौर्य दाखविण्यासाठी काही नागरिक दांडपट्टा खेळ खेळत होते. या रॅलीमध्ये गोवारी सजामातील शेकडो नागरिक सहभागी होत होते. ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जात होती. काळाच्या ओघात आता मिरवणूक काढणे बंद झाले असले तरी ढालीचे पूजन मात्र दरवर्षी अखंडपणे चालू आहे.
वैरागडात १०० वर्षांपासून ढालपूजन
By admin | Updated: November 13, 2015 01:31 IST