दिलीप दहेलकर - गडचिरोली वीज पुरवठ्याची सोय असलेल्या जिल्ह्यातील ४० जि. प. शाळांमध्ये ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात येणार असून यात पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. याकरिता शासनाकडून १ कोटी रूपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. ४० शाळांमध्ये संगणक व इतर सर्व साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. शिक्षकांना ई-लर्निंगचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून ४० शाळांमध्ये ई-लर्निंग प्रणाली सुरू होणार असल्याची माहिती प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. जिल्ह्यातील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन खूप उशिरा का झाले ? शासनाकडून वेतनाचे अनुदान उशीरा मिळत असते. तसेच मार्च एन्डींगमुळे मार्च महिन्याचे वेतन उशीरा झाले. शालार्थ वेतन प्रणालीचे काम कुठपर्यंत झाले आहे ? एप्रिल महिन्यापासून सर्व शिक्षकांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीनुसार आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २४ मार्चला सर्व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना गडचिरोलीत बोलावून त्यांना पोरेड्डीवार अभियांत्रिकी विद्यालय व स्कूल आॅफ स्कॉलर शाळेतील संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. सर्व शाळांची वेतनबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. दुर्गम भागातील शाळांची माहिती लवकर अपडेट झाली. यामुळे आता १० मे पर्यंत एप्रिल महिन्याचे सर्व शिक्षकांचे वेतन होईल. शालार्थ वेतनप्रणालीच्या कामात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम आणि गडचिरोली जिल्हा दुसर्या क्रमांकावर असल्याचे शिक्षण संचालकांनी मान्य करून अभिनंदन केले. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमुळे जि. प. च्या तसेच मराठी माध्यमांच्या खाजगी शाळांची विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. पटसंख्या कायम टिकवून ठेवण्यासाठी यंदा कोणते प्रयत्न केले जाणार आहेत ? गतवर्षीपेक्षा यंदाच्या शैक्षणिक सत्रात प्रत्येक शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १० टक्क्यानी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पटसंख्या न वाढल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आॅक्टोबर २०११ मध्ये राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष पट पडताळणी मोहीमेदरम्यान किती शाळांमध्ये ५० टक्क्याच्या आत पटसंख्या आढळून आली व किती शिक्षक अतिरिक्त ठरले? पटपडताळणीदरम्यान ५० टक्क्याच्या आत पटसंख्या आढळून आलेल्या शाळांची संख्या ४४ आहे. यात जिल्हा परिषदेच्या ४१, खाजगी अनुदानित २, कायम विनाअनुदानित एका शाळेचा समावेश आहे. यात १४ शिक्षक अतिरिक्त ठरले. यापैकी १२ शिक्षकांचे जि. प. शाळेत समायोजन करण्यात आले असून उर्दू माध्यमाच्या दोन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बाकी आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील जि. प. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न कोणते? जि. प. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खाजगी अनुदानित शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी चार योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी शाळेवर वेळेवर उपस्थित होणे, पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेचे दहा शब्द दररोज पाठांतर करवून घेणे, गणिताच्या कोणत्याही पाच क्रिया रोज विद्यार्थ्यांकडून करवून घेणे, सामान्य ज्ञानाचे पाच प्रश्न पाठ करवून घेणे, गुणवत्ता वाढलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांचा छोटेखानी सत्कार करणे या उपक्रमाचा समावेश आहे. गतसत्रात गुणवत्ता वाढीसाठी उत्कृष्ट कार्य करणार्या चार ते पाच मुख्याध्यापकांचा सत्कार केला.
जिल्ह्यातील ४० शाळा ई-लर्निंगने जोडणार
By admin | Updated: May 11, 2014 00:17 IST