चोरट्यांचा सुगावा नाही : शिवकृपा पतसंस्था व डाक कार्यालय फोडलेकुरखेडा : येथील गांधी चौकात असलेल्या शिवकृपा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था व पोस्ट आॅफीस कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत २ लाख २७ हजार रूपयांचा रोख माल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. गांधी चौकात असलेल्या शिवकृपा पतसंस्थेत दररोज एजंटांद्वारे बाजारपेठेतून आरडीची रक्कम गोळा करून भरण्यात येते. तसेच विद्युत बिलाचा भरणासुध्दा सदर शाखेत करण्यात येत असल्याने मोठी रक्कम येथे राहते. ही संधी साधत चोरट्यांनी शाखा इमारतीच्या समोरच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व येथील लॉकर फोडून २ लाख २६ हजार १७ रूपये रोख रक्कम पळविली. याचवेळी गांधी चौकात असलेल्या पोस्ट आॅफीस कार्यालयात सुध्दा चोरट्यांनी समोरच्या दरवाज्याचे कुलूप तोडत प्रवेश केला व तेथील १ हजार ६२० रूपये पळविले. मंगळवारी सकाळी पतसंस्थेच्या इमारतीच्या समोरच्या शटरचे कुलूप तुटलेले असल्याचे निदर्शनास येताच पतसंस्थेचे संचालक व कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी येऊन पोलिसांनी पंचनामा केला. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र आरोपीचा कोणताही सुगावा लागला नाही. एक-दीड महिन्यांपूर्वी शहरातील मनुजा कॉम्प्लेक्समधील दुकानातील व बाजारातील धान्य दुकानात सुध्दा कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व माल लंपास केला होता. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेड्यात २ लाख २७ हजारांची चोरी
By admin | Updated: January 13, 2016 01:52 IST