The Family Man 3 Trailer: श्रीकांतचं संपूर्ण कुटुंब धोक्यात! 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर, जयदीप अहलावतचा खलनायक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:01 IST2025-11-07T13:57:06+5:302025-11-07T14:01:22+5:30
The Family Man 3 Trailer Out: 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मनोज वाजपेयी- जयदीप अहलावत हे अभिनेते या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत

The Family Man 3 Trailer: श्रीकांतचं संपूर्ण कुटुंब धोक्यात! 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर, जयदीप अहलावतचा खलनायक चर्चेत
भारतातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन’ सीझन ३चा उत्कंठावर्धक ट्रेलर आज रिलीज झाला आहे. मनोज वाजपेयी पुन्हा एकदा सीक्रेट एजंट श्रीकांत तिवारीची भूमिका करण्यास सज्ज आहे. यावेळी मात्र श्रीकांतसोबत त्याचं संपूर्ण कुटुंब धोक्यात आहे. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये श्रीकांतचं आजवरचं सर्वात कठीण मिशन दिसणार आहे. इतकंच नव्हे 'द फॅमिली मॅन ३'च्या ट्रेलरमध्ये जयदीप अहलावतने खलनायकाच्या भूमिकेत मैफिल लुटली आहे.
'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर
राज आणि डीके यांनी त्यांच्या D2R Films या बॅनरखाली निर्मित केलेली 'द फॅमिली मॅन ३' ही बहुचर्चित सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज आहे. सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसतं की श्रीकांत तिवारी त्याच्या छोटा मुलाला तो एजंट असल्याचं सांगतो. मुलाला आधी वाटतं की, बाबा ट्रॅव्हल एजंट आहेत. पण नंतर श्रीकांत तो सीक्रेट एजंट असल्याचं सांगतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं. पुढे श्रीकांतला मोस्ट वाँटेड गुन्हेगार म्हणून घोषित केलं जातं. त्यामुळे स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी श्रीकांत मुंबई सोडून एका अज्ञात ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतो.
श्रीकांतच्या मागावर जयदीप अहलावत आणि निम्रत कौर असलेले दिसतात. या सर्वांचा उद्देश काय? श्रीकांत त्याच्या कुटुंबाचं रक्षण करण्यास यशस्वी होईल का? याची उत्तरं सीरिज आल्यावरच मिळतील. श्रीकांतसोबत पुन्हा एकदा त्याचा सहकारी जेके दिसतोय. या दोघांची मिश्किल मैत्री सर्वांना हसवून सोडतेय यात शंका नाही. यावेळी जयदीप अहलावतने साकारलेला खलनायक काळजात धडकी भरवणारा आहे. यानिमित्ताने मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघणं ही एक पर्वणी ठरणार आहे.
'द फॅमिली मॅन ३' ही वेबसीरिज २१ नोव्हेंबरला अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी, प्रियामणी, शरीब हाश्मी, अश्लेशा ठाकूर, वेदांत सिन्हा, निम्रत कौर आणि जयदीप अहलावत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. आधीच्या दोन सीझनप्रमाणे 'द फॅमिली मॅन ३'चा हा सीझन प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करणार यात शंका नाही.