सई, सिद्धार्थ ते भरत जाधव... मराठी कलाकारांबद्दल विजय वर्मा म्हणाला "इतकी मोठी माणसं, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:16 IST2026-04-24T10:15:56+5:302026-04-24T10:16:12+5:30
विजय वर्मानं 'मटका किंग' या वेबसीरिजमध्ये मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव केला शेअर, म्हणाला...

सई, सिद्धार्थ ते भरत जाधव... मराठी कलाकारांबद्दल विजय वर्मा म्हणाला "इतकी मोठी माणसं, पण..."
Vijay Varma on Marathi Actors: सध्या सगळीकडे 'मटका किंग' या वेबसीरिजची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजचं लेखन, निर्मितीची बाजू सांभाळण्यासोबतच दिग्दर्शनही मराठमोळे नागराज मंजुळे यांनी केलं आहे. विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या या सीरिजमध्ये सई ताम्हणकरसोबतच सिद्धार्थ जाधव ते भरत जाधव असे अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजय वर्माने मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव शेअर केला.
मराठी कलाकारांसोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल विजयने नुकतंच 'मुंटा' दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केलं. तो म्हणाला, "मराठी सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. ही टीम म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कुटुंबच होतं. सेटवर प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेत इतका रमलेला असायचा की, तिथे काम करताना एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती".
पुढे तो म्हणाला, "सई एक अत्यंत उत्कृष्ट आणि गुणी अभिनेत्री आहे. तर सिद्धार्थसोबत काम करताना खूप मजा आली. त्याचं कॉमिक टायमिंग तर जबरदस्त आहेच, पण तो एक अतिशय संवेदनशील अभिनेता देखील आहे. तसेच गिरीश कुलकर्णी, भरत जाधव, किशोर कदम अशा महान कलाकारांसोबत काम करणं माझ्यासाठी शिकण्यासारखं होतं. इतकी मोठी माणसं असूनही कोणामध्येही अहंकार नव्हता. सगळे खूप संयमानं, एकमेकांना समजून घेत काम करत होते. ही गोष्ट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली".
काय आहे 'मटका किंग'ची कथा?
ब्रिज भट्टी (विजय वर्मा) एक हुशार कापूस व्यापारी असून १९६० च्या दशकातील नव्या भारतातील मुंबईमध्ये चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहतो. एका दमदार कल्पनेच्या जोरावर तो जुगाराला श्रीमंतांच्या छंदातून मोठ्या चळवळीत बदलतो आणि 'मटका'चा जन्म होतो. 'मटका किंग' ही सीरिज एका अशा जगात घेऊन जाते, जिथे 'मटका' हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे. जर तुम्ही अद्याप ही सीरिज पाहिली नसेल तर ती प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.