प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:21 IST2026-01-10T11:20:08+5:302026-01-10T11:21:55+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. तिच्या बॉयफ्रेंडने परदेशात खास अंदाजात अभिनेत्रीला लग्नाची मागणी घालून साखरपुडा केला आहे

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
लोकप्रिय टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मध्ये 'माया'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नविका कोटिया (Navika Kotia) हिने आपल्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. नविकाने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कडाक्याच्या थंडीत अतिशय रोमँटिक पद्धतीने तिच्या जोडीदाराने तिला लग्नासाठी मागणी घातली.
नविका कोटिया सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात आहे. तेथील कडाक्याच्या थंडीत तिच्या जोडीदाराने तिला सरप्राईज दिले. बर्फाच्छादित डोंगर आणि निसर्गरम्य वातावरणात नविकाच्या जोडीदाराने गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले. नविकाने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
कोण आहे तिचा जोडीदार?
नविकाने तिच्या जोडीदाराचा चेहरा आणि नाव अद्याप उघड केलेले नाही, मात्र शेअर केलेल्या फोटों आणि व्हिडीओत दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. "आयुष्यातील सुंदर सरप्राईज!" असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. या फोटोंमध्ये ती आपली एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसत असून तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसतोय. नविकाच्या या पोस्टवर टीव्ही विश्वातील तिचे मित्र-मैत्रिणी आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील तिचे सहकलाकार आणि इतर सेलिब्रिटींनी तिच्या नवीन आयुष्यासाठी तिला आशीर्वाद दिले आहेत. नविकाने बालकलाकार म्हणूनही काम केले असून तिला 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटात श्रीदेवी यांच्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिले आहे. नविकाच्या साखरपुड्याच्या या फोटोंनी चाहत्यांचे मन जिंकले असून, आता नविकाच्या लग्नाची तारीख कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.