/>लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट अर्थात 'तुझं माझं ब्रेकअप' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. प्रेम विवाह झालेल्या जोडप्यांना आपलीशी वाटणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. समीर आणि मीराच्या नात्याची ही आगळीवेगळी कहाणी आता आली आहे एका नवीन वळणावर. लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे हे दोघे आता एकमेकांनाच सहन करत आहेत असं चित्र निर्माण झालंय. दोघांच्या घरच्यांनीही एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. समीर आणि मीराच्या नात्यातील कटुता दूर करण्यासाठी आता मालिकेत एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे.'तुझं माझं ब्रेकअप'च्या एका तासाच्या विशेष भागात रसिकांना पाहायला मिळणार आहे, नवीन पात्राच्या आगमनाने समीर आणि मीराच्या नात्यात येणारं नवं वळण रसिकांनाही सुखद धक्का देणारा ठरणार आहे.मीराला समीरच्या आयुष्यातून दूर लोटण्याची एकही संधी लता सोडत नाही. मीरासुद्धा लताचा प्रत्येक डाव उधळून लावण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नांची शर्थ करतेय. लताने मिरासमोर ठेवलेल्या १० जाचक अटींचं आव्हान आणि हे आव्हान परतून लावण्याचा मीरानं केलेला निश्चय आणि दुसरीकडे समीर आणि मीराच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि लताला शह देण्यासाठी येत आहे समीरची आजी आणि ती आजी साकारली आहे रोहिणी हट्टंगडी यांनी. मीराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि लताचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आता समीरच्या आजीनं सूत्र आपल्या हातात घेतली आहेत.'होणार सून मी ह्या' घरची मालिकेत जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आईआजी आजही रसिकप्रेक्षकांच्या लक्स्मषात आहे. आता पुन्हा एका नव्या भूमिकेत आणि नव्या लुकमध्ये रोहिणी हट्टंगडी छोट्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहेत.समीरच्या आजीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.आता समीरच्या आजीच्या येण्याने मीरा आणि समीरच्या नात्यात पुन्हा सुखाचे क्षण येतील का? लताने दिलेलं आव्हान परतवून लावण्यात मीरा यशस्वी होईल का? या प्रश्नांची उत्तरं या विशेष भागात उलगडणार आहेत.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेनंतर रोहिनी हट्टंगडी
“सख्या रे” या मालिकाद्वारे छोट्या पडद्यावर तब्बल 3 वर्षानंतर एंट्री केली.प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून रोहिणी हट्टंगडी यांना छोट्या पडद्यावर बघण्याची जी हुरहूर होती ती सख्या रे या मालिकेने पूर्ण केली होती.सख्या रे मालिकनेतंर आता 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेमध्ये आजीच्या भूमिकेत झळकणार आहेत.नक्कीच त्यांच्या अभिनयाच्या साथीने हि भूमिका अजूनच वजनदार होईल यात शंका नाही.