स्वप्न पूर्ण झालं! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; दाखवली २३व्या मजल्यावरील घराची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:05 IST2025-12-15T16:05:04+5:302025-12-15T16:05:31+5:30
काही दिवसांपूर्वीच वनिताने मुंबईत हक्काचं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत वनिताने तिच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे.

स्वप्न पूर्ण झालं! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; दाखवली २३व्या मजल्यावरील घराची झलक
मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात हिनेदेखील तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच वनिताने मुंबईत हक्काचं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत वनिताने तिच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे.
वनिताने मुंबईतील बिल्डिंगमध्ये २३व्या मजल्यावर घर घेतलं आहे. छोटीशी पूजा करत अभिनेत्रीने तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की लाल रीबन कापून अभिनेत्रीने घराचा दरवाजा उघडला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत वनिताने पती सुमित लोंढेसोबत गृहप्रवेश केला आहे. तिच्या गृहप्रवेशाला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार मंडळीही उपस्थित होते. रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव यांनी वनिताच्य गृहप्रवेशाला हजेरी लावली होती. "हक्काचं घर, हक्काची माणसं", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, वनिताने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'मध्येही वनिता झळकली होती. छोट्याशा भूमिकेतही ती भाव खाऊन गेली होती. गुलकंद, सरला एक कोटी, चिकी चिकी बूबुमबुम, फुलवंती या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.