अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:20 IST2025-12-05T16:11:43+5:302025-12-05T16:20:23+5:30
इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका
गेल्या काही दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्स विमानांचा मोठा गोंधळ झाला आहे. इंडिगोच्या अनेक विमानांची उड्डाण रद्द झाली, काही विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. या 'इंडिगो संकटा'चा फटका प्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यालाही बसला असून, त्याला गोवा ते मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी तब्बल ४.२ लाख रुपये खर्च करावे लागले आहेत.
राहुल वैद्यने सांगितला अनुभव
राहुल वैद्यने गुरुवारी इंस्टाग्राम स्टोरीजमधून आपला अनुभव सांगितला. इंडिगोच्या गोंधळामुळे त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना गोव्याहून मुंबईला परतताना प्रचंड त्रास झाला. त्याने एका पोस्टमध्ये आपला सेल्फी शेअर करत लिहिले, "विमानाने प्रवास करण्यासाठी हा सर्वात वाईट दिवसांपैकी एक आहे! आणि आज रात्री कोलकाता येथे आमचा शो आहे... तिथे कसे पोहोचायचे, हे अजूनही आम्हाला माहीत नाहीये!"
या प्रवासादरम्यान राहुल वैद्यला जो खर्च करावा लागला, त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. राहुलने अनेक बोर्डिंग पासचे फोटो शेअर केले आणि सांगितलं की, गोव्याहून मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आणि त्याच्या टीमला ४ लाख २० हजार रुपये खर्च करावे लागले.
राहुल वैद्य लिहितो, "या बोर्डिंग कार्ड्सची किंमत ४.२० लाख आहे आणि हा खर्च फक्त मुंबईपर्यंतचा आहे... आणि आता मुंबई ते कोलकाताचा खर्च वेगळा असेल. माझ्या आयुष्यात केलेला हा सर्वात महागडा देशांतर्गत प्रवास आहे."
इंडिगोने मागितली माफी
गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या गोंधळामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडले आहे. दररोज अंदाजे १७० ते २०० विमाने रद्द किंवा उशीराने उडत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक विमानतळांवर प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्याने ते अडकून पडले आहेत. या संकटाचा फटका केवळ राहुल वैद्यलाच नाही, तर अनेक सेलिब्रिटींना बसला आहे. अभिनेत्री निया शर्माने देखील एका विमान प्रवासासाठी ५४ हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.