"आम्हाला विजेत्याचं नाव आधीच दिसलं होतं..."; आर्या आंबेकरने सांगितला 'सारेगमप'चा खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:46 IST2025-12-15T12:41:29+5:302025-12-15T12:46:43+5:30
गायिका आर्या आंबेकरने 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चा खास किस्सा सांगितला आहे. हा किस्सा वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

"आम्हाला विजेत्याचं नाव आधीच दिसलं होतं..."; आर्या आंबेकरने सांगितला 'सारेगमप'चा खास किस्सा
आर्या आंबेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायिका. 'ती सध्या काय करते' सिनेमातून आर्याच्या अभिनयाचीही बाजू लोकांना दिसली. झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' स्पर्धेत आर्या आंबेकर झळकली होती. आर्याने बालपणीच तिच्या आवाजाची जादू सर्वांना दाखवली. त्यानंतर आर्याने पुढेही अनेक सिनेमा, मालिकांसाठी गाणी गायली आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आर्याने नुकत्याच एका मुलाखतीत 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा खास किस्सा सांगितला.
आर्या - प्रथमेशला विजेत्याचं नाव आधीच दिसलं होतं
आरपारला दिलेल्या मुलाखतीत आर्या आंबेकरने हा किस्सा शेअर केला. आर्या म्हणाली, ''ग्रँड फिनालेचा आमचा खूप मजेशीर किस्सा आहे. मी आणि प्रथमेश लघाटे आमच्यात अशी अंतर्गत स्पर्धा होती की, तू जिंकणार किंवा मी जिंकणार. बघू दोघांपैकी कोण जिंकेल, असं आमच्यात असायचं. खळे काकांनी आमचा रिझल्ट अनाऊन्स केला. ते खुर्चीत बसले होते. त्यांच्या एका बाजूला मी होते आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश होता. त्यानंतर उरलेले लिटिल चॅम्प्स बाजूला होते. त्यांनी ती चिठ्ठी उघडली तेव्हाच आम्हाला नाव दिसलं होतं. आम्ही दोघेही खूश. तू पण नाही जिंकला, मी पण नाही जिंकले.''
''एवढंच त्यावेळी कळत होतं. म्हणजे विजेता आणि उपविजेता यात काय फरक असतो, हेच मुळात माहित नव्हतं. रोहित त्यावेळी कार्तिकीला म्हणालाही होता की, मग काय झालं तुझ्या ट्रॉफीवर विजेती आणि माझ्या ट्रॉफीवर उपविजेती लिहिलंय. मी उप खोडलं तर मीही विजेता. इतका आमचा साधा दृष्टीकोन होता.''
''कार्तिकीचे बाबा मुलाखतीत म्हणाले होते. कार्तिकी विजेती होती, त्यामुळे तिला त्या विजेतेपदाचे खूप फायदे घेता आले असते. पण तिचेही बाबा हेच म्हणाले होते की, जरी कार्तिकी विजेती असेल तरीही आमच्या दृष्टीने पाचही जण विनर आहेत. आमच्या पालकांमध्येही इतकं छान वातावरण होतं त्यामुळे मुलांपर्यंत ती स्पर्धा कधी आली नाही.''