शिर्डी संस्थान 'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना करणार ११ लाखांची मदत; कुटुंबाला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:03 IST2025-12-04T11:59:23+5:302025-12-04T12:03:53+5:30
साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना शिर्डी साई बाबा संस्थानाकडून ११ लाखांची मदत करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सुधीर यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे

शिर्डी संस्थान 'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना करणार ११ लाखांची मदत; कुटुंबाला मोठा दिलासा
साई बाबा फेम अभिनेते सुधीर दळवी गेल्या काही दिवसांपासून आजारपणाने त्रस्त आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबाने अभिनेत्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. अशातच सुधीर दळवी यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बॉम्बे हायकोर्टने शिर्डी श्री साई बाबा संस्थानला सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी मदत करण्याची परवानगी दिली आहे.
सुधीर दळवी यांना ८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याच्या उपचारासाठी कुटुंबाने १५ लाख रुपयांच्या मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने तत्काळ मदत केली होती.
सुधीर दळवी यांना मदत करण्यासाठी शिर्डी साई बाबा संस्थानाकडे आर्थिक मदत करण्यासाठी हाय कोर्टाची परवानगी घेणं भाग होतं. परंतु हाय कोर्टाने मंजुरी दिल्याने आता शिर्डी साई बाबा ट्रस्ट सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी खर्च करायला तयार आहे. त्यामुळे शिर्डी साई बाबा संस्थानाकडून सुधीर दळवींना लवकरच ११ लाख रुपये मदत मिळण्याची शक्यता आहे.
मागील काही काळापासून सुधीर दळवी हे सेप्टिक इन्फेक्शन झाल्याने गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारांसाठी १५ लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. त्यांच्या कुटुंबाला एवढी मोठी रक्कम एकाच वेळी जमा करणे शक्य नसल्याने त्यांनी चित्रपटसृष्टीतील लोकांना आणि सुधीर यांच्या चाहत्यांना मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं होतं. सुधीर दळवी हे सध्या ८६ वर्षांचे आहेत. आता शिर्डी संस्थानाने मदतीचा हात पुढे केल्याने सुधीर दळवी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.