देवीच्या फोटोचा केक कापणार? 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' टीमला नेटकऱ्याचा प्रश्न; चॅनलने दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 14:55 IST2024-03-30T14:55:08+5:302024-03-30T14:55:47+5:30
५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त मालिकेच्या टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं. तेव्हा त्यांच्याकडून झालेली एक गंभीर चूक नेटकऱ्याने लक्षात आणून दिली. मात्र झी मराठीने नेटकऱ्याला स्पष्टीकरण दिलं आहे.

देवीच्या फोटोचा केक कापणार? 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' टीमला नेटकऱ्याचा प्रश्न; चॅनलने दिलं उत्तर
झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satwi Mulgi) मालिकेचे नुकतेच 500 भाग पूर्ण झाले. ही मालिका सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेली आहे. त्रिनयना देवी आणि तिच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी नेत्रा भोवती मालिकेचं कथानक फिरतं. अभिनेत्री तितिक्षा तावडेने (Titeeksha Tawde) नेत्रा हे पात्र साकारलं आहे. तर अजिंक्य ननावरेने तिचा नवरा आहे. मालिकेत सुरुची अडारकरही आली आहे. ५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त मालिकेच्या टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं. तेव्हा त्यांच्याकडून झालेली एक गंभीर चूक नेटकऱ्याने लक्षात आणून दिली. मात्र झी मराठीने नेटकऱ्याला स्पष्टीकरण दिलं आहे.
सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या टीमने काल जंगी सेलिब्रेशन केले. तितिक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे असे सर्वच यावेळी हजर होते. सेटवरच बरेच पाहुणे आलेले दिसत आहेत. चॅनल, मीडिया, एडिटिंग टीम अशा सर्वांनीच एकत्र येत केक कटिंग केलेलं पाहायला मिळालं. यावेळी समोर दोन मोठे केक होते. एका केकवर तितिक्षाचा मालिकेतला लूक आणि देवीचा फोटो दिसत आहे. यावरुनच नेटकऱ्याने चॅनलला प्रश्न विचारला.
'देवीच्या फोटोचा केकही कापणार का?' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. यावर चॅनलने स्पष्टीकरण देत लिहिले, 'केकचा तो भाग बाजूला काढून ठेवला होता! त्रिनयना देवी या मालिकेचा मूळ गाभा आहे. हे रहस्य तिने योजलेलं आहे. त्यामुळे सगळ्या क्रिएटीव्हवर तिची प्रतिमा असतेच.'