"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:28 IST2025-03-04T11:28:35+5:302025-03-04T11:28:59+5:30

संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे फोटो व्हायरल झाले आणि सर्व महाराष्ट्र हादरला. या प्रकरणावर अभिनेते किरण माने यांनी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट लिहिली आहे (kiran mane)

santosh deshmukh death viral photos marathi actor kiran mane post in beed | "मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh) यांच्या मृत्यूचे फोटो व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. नराधमांनी केलेली संतोष देशमुख यांनी निघृण हत्या पाहून सर्वजण भावुक झालं. अखेर या सर्व प्रकरणावर अभिनेते किरण माने (kiran mane) यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. किरण माने लिहितात की, "बहुजनांनो, संतोष देशमुखला न्याय मिळवूनच द्यायचा असेल तर पहिल्यांदा ‘जात’ दूर ठेवा. संतोषच्या मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे अनाजीपंती कपट असू शकतं. बळी पडू नका."

"आपल्याला जातीजातीत लढवून जुल्मी सत्तेचा फास सर्वसामान्यांभोवती आवळायचा हा डाव आहे ! कमकुवत पडत चाललेल्या कोरटकरी, सोलापूरकरी गिधाडांना बळ देण्यासाठी आपल्यात फुट पाडाण्याचा कट आहे हा. खून झालेला एक तुमच्या-माझ्यासारखा ‘माणूस’ होता… आणि मारेकरी माजोरड्या सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असणारे आहेत ! वर्तमानात आपल्या भवताली याच दोन जाती आहेत. ‘सामान्य माणूस विरूद्ध सत्तेतले नराधम’… याच दोन जातीत सध्याचा संघर्ष सुरू आहे, हे मेंदूत कोरून घ्या."

"‘मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जात आहे… गुन्हेगारांच्या म्होरक्याला वाचवण्यासाठीचं ते कारस्थान आहे. एक सत्य समजून घ्या की याच मारेकरी नराधमांनी याच बीडमध्ये अनेक वंजाऱ्यांचाही बळी घेतला आहे ! … त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात बोलताना ‘मराठा-वंजारी’ अशा जातीवरून कमेंट करू नका. फक्त ज्या सत्ताधाऱ्यांच्या बळावर त्यांनी हे निर्घृण कृत्य केलं त्या सत्ताधाऱ्यांना टारगेट करा."



"बीड हे अत्यंत प्राचीन समृद्ध वारसा असलेलं ऐतिहासिक गांव आहे. त्याला हिणवण्यासाठी बिहारची उपमा देऊ नका. खुद्द महात्मा गांधींनी सत्याग्रहात संपूर्ण भारतातून जे पहिले सहा सत्याग्रही निवडले त्यात बीडचे हिरालाल सुखलालजी कोटेचा होते ! पानिपतात हरल्यानंतर निजामशाहीला पराभूत करून मराठ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य आलं ते याच भूमीत. याच बीडमध्ये शंभर वर्षांपूर्वी अत्यंत दानशूर असलेल्या धोंडोजी किसन यांनी मुस्लिम बांधवांसाठी स्वखर्चानं मशीद बांधून दिली होती ! तो परिसर आजही धोंडीपुरा या नावानं ओळखला जातो."

"अशा बीडला गुन्हेगारीचा कलंक लागणं हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. बीड हा महाराष्ट्राचा अभिमान होता. पुढे रहावा असे वाटत असेल तर जातपात बाजूला ठेवा. संतोष देशमुख प्रकरणात कोण आहेत, त्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे जगजाहीर आहे. त्या सगळ्यांना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे यावर जोर द्या ! जय शिवराय… जय भीम"
 

Web Title: santosh deshmukh death viral photos marathi actor kiran mane post in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.